मुंबई : बेस्ट प्रशासनाने सेवेतील हलगर्जीपणामुळे कंत्राट रद्द केलेल्या कंपनीच्या जवळपास १०० बसगाड्या बेस्ट उपक्रमाच्या वडाळा येथील आणिक आगारात धूळखात पडल्या आहेत. गेल्या एक ते दीड वर्षांपासून उभ्या असलेल्या या बसगाड्या झुडपांनी पूर्णपणे वेढल्या गेल्या आहेत. कंत्राटदार कंपनीकडे बेस्टची देणी शिल्लक असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान, आगारात उभ्या असलेल्या बसगाड्यांची लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अपुऱ्या बसगाड्यांमुळे मुंबईकरांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी बेस्ट उपक्रमाने डिसेंबर २०२१ मध्ये एका कंपनीला २७५ बसगाड्यांचे कंत्राट दिले होते. मात्र, कंत्राटदार कंपनीने कंत्राटातील अटी शर्तीची पूर्तता केली नाही. सेवा पुरवण्यात सातत्याने हलगर्जीपणा होत असल्याने बेस्ट उपक्रमाने वारंवार कंत्राटदार कंपनीला नोटीस बजावल्या. मात्र, सेवेमध्ये सुधारणा न झाल्याने बेस्ट प्रशासनाने संबंधित कंपनीबरोबर केलेले कंत्राट २०२२ मध्ये रद्द केले. कंत्राटातील २७५ पैकी १७५ गाड्या कंत्राटदार कंपनी घेऊन गेली. मात्र, उर्वरित १०० गाड्या वडाळ्यातील आणिक आगारात उभ्या आहेत. तसेच, कंत्राटदार कंपनीही तोट्यात गेल्याने अखेर त्यांनी ‘राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडे कर्जबाजारी झाल्याचे जाहीर केले. या कंपनीला बसगाड्या घेण्यासाठी ज्या बॅंकांनी किंवा आर्थिक संस्थांनी मदत केली होती त्यांनी कंपनीविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी समापकाची (लिक्वीडेटर) नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, आणिक आगारात उभ्या असलेल्या बसगाड्यांची लिलाव प्रक्रिया पार पडल्याचे एका सूत्राने सांगितले.

बेस्ट उपक्रमाकडे सद्यस्थितीत स्वतःच्या मालकीच्या ४३०, तर भाडेतत्त्वावरील २६०० अशा एकूण ३०३० बस आहेत. बेस्टमधून दरदिवशी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सुमारे २५-२६ लाख असल्यामुळे त्या गाड्या अपुऱ्या पडत आहेत. परिणामी, प्रवाशांना रांगेत ताटकळत बसची वाट पाहावी लागत आहे. सकाळी आणि सायंकाळी गर्दीने तुडुंब भरलेल्या बसमधून प्रवास करताना प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने नवीन बसगाड्या खरेदी कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

सध्या आणिक आगारात असलेल्या बसगाड्यांचा बेस्ट उपक्रमाशी काहीही संबंध नाही. हे कंत्राट केव्हाच रद्द झाले आहे. कंत्राटदार कंपनीकडे बेस्टची देणी रखडली आहे. गाड्यांच्या लिवाव प्रक्रियेतून मिळणाऱ्या पैशातून बेस्टची देणी दिली जातील, अशी माहिती बेस्ट उपक्रमातील अधिकाऱ्यांनी दिली. तसेच, दोन वर्षांपूर्वी सहा हजार बसगाड्यांसाठी कंत्राटदाराला कार्यादेश देण्यात आले होते. मात्र पुरवठादाराने बसगाड्या दिलेल्या नाहीत. त्यामुळे बसगाड्यांची कमतरता भासत आहे. संबंधित गाड्या बेस्टच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर समस्या कमी होईल, असेही त्यांनी नमूद केले.