मुंबई : वाढवण बंदर नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी वाढवण बंदर-इगतपुरी दरम्यान ११८ किमी लांबीचा द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे. हा संपूर्ण महामार्ग कार्यान्वित झाल्यास वाढवण बंदर-इगतपुरी अंतर केवळ एका तासात पार करता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

या महामार्गावरील चारोटी-इगतपुरी दरम्यानच्या ८५.३८ किमी लांबीच्या मार्गाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) करणार असून प्रकल्प अंमलबजावणी व्यवहार्यता तसापणीचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. या महामार्गासाठी १८,०२० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून हा मार्ग पालघरमधील ३३, तर नाशिकमधील ९ गावांमधून जाणार आहे. दरम्यान, प्रकल्पाची अंमलबजावणी ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ तत्त्वाने वा इतर कोणत्या प्रारूपाप्रमाणे करायची याबाबतचाही अभ्यास सुरू आहे.

पालघरमधील वाढवण येथे देशातील सर्वात मोठे बंदर बांधण्यात येत आहे. त्यामुळे वाढवण बंदर-इगतपुरी महामार्गाचा प्रकल्प महत्त्वाकांक्षी मानला जात असून या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम शक्य तितक्या लवकर मार्गी लागावे यासाठी एमएसआरडीसीकडून प्रकल्प अंमलबजावणी व्यवहार्यता अभ्यासाला वेग देण्यात आला आहे. चारोटी-इगतपुरी महामार्ग पालघर आणि नाशिक अशा दोन जिल्ह्यांतून जाणार आहे. मुंबई-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील तवा येथून हा महामार्ग सुरू होऊन समृद्धी महामार्गास इगतपुरी येथे जोडला जाणार आहे. पालघरमधील डडाणू, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा या तालुक्यांतील ३३ गावांमधून, तर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यांतील नऊ गावांमधून जाणार आहे. या महामार्गामुळे नाशिक जिल्हा थेट पालपर जिल्ह्याशी जोडला जाणार असून या महामार्गामुळे औद्याोगिक विकास साधला जाणार आहे. एमएसआरडीसीने चारोटी-इगतपुरी द्रुतगती महामार्गाच्या संरेखनासंबंधीचा प्रस्ताव यापूर्वीच राज्य सरकारकडे पाठवला असून या प्रस्तावाच्या मान्यतेची प्रतीक्षा एमएसआरडीसीला आहे.

तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन

चारोटी-इगतपुरी द्रुतगती महामार्गाचे संरेखन अंतिम झाल्यास पुढील कार्यवाहीला वेग देऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात केली जाणार आहे. मात्र, ही कार्यवाही पूर्ण होण्यास किती कालावधी लागणार हे अद्याप निश्चित नाही. असे असले तरी महामार्गाचे काम सुरू झाल्यापासून तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे.

९२३.८० हेक्टर जमिनीची आवश्यकता

एनएचएआयला ३२.२८ किमी लांबीच्या वाढवण बंदर-तवा द्रुतगती महामार्गासाठी एकूण ६०६ हेक्टर जागेचे संपादन करावे लागणार आहे. दुसरीकडे एमएसआरडीसीला ८५.३८ किमी लांबीच्या तवा, चारोटी-इगतपुरी द्रुतगती महामार्गासाठी एकूण ९२३.८० हेक्टर जागा संपादित करावी लागणार आहे. पालघरमधील ३३ आणि नाशिकमधील ९ गावांमधील ही जमीन असणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 118 km long expressway will be constructed between vadhavan port to igatpuri zws