मंगल हनवते, लोकसत्ता
मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी कृती आराखडय़ाअंतर्गत विविध उपाययोजना केल्या आहेत. वाहनचालकांसाठी ५२० किमी मार्गावरील प्रत्येक इंटरचेंजवर समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले असून २३ वाहनांद्वारे महामार्गावर गस्त घालण्यात येत आहे. त्याचबरोबर १२२ सुरक्षारक्षकांची फौजही तैनात करण्यात आली आहे. महामार्गावर दररोज हजारो वाहनांची तपासणी करण्यात येत असून आतापर्यंत टायर सुस्थितीत नसलेल्या २१ हजार ५३ वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. त्यात ९२३ वाहनांना महामार्गावर प्रवेश नाकारण्यात आला आहे. इतक्या उपाययोजना केल्यानंतरही अपघात रोखण्यात यंत्रणांना यश आलेले नाही.
समृद्धी महामार्ग वाढत्या अपघातांमुळे वादग्रस्त ठरला आहे. यामुळे एमएसआरडीसीला मोठय़ा टीकेला सामोरे जावे लागत आहे. वाहनचालकांकडून वेगमर्यादेसह इतर नियमांचे होणारे उल्लंघन आणि महामार्ग संमोहनामुळे अपघात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वाहनचालक-प्रवाशांना शिस्त लावून अपघात रोखण्यासाठी तयार केलेल्या विशेष कृती आराखडय़ाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मुळात इंडियन रोड काँग्रेसच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार समृद्धी महामार्गाची रचना करण्यात आली आहे. राज्याच्या अपर पोलीस महासंचालकांनी (वाहतूक) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ताशी १२० किमी इतकी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. वाहनांची वेगमर्यादा, दिशादर्शक चिन्हे, सूचना, आणि माहितीबाबतचे फलक जागोजागी लावण्यात आले आहेत. मात्र यानंतरही अपघात होत आहेत.
एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ५२० किमी लांबीच्या महामार्गावर महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाचे १२२ सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. संपूर्ण महामार्गावर गस्त घालण्यासाठी एमएसआरडीसीने स्वखर्चातून महामार्ग पोलिसांना १५ वाहने, तर प्रादेशिक वाहतूक कार्यालयास आठ वाहने उपलब्ध करून दिली आहेत. महामार्ग संमोहन, तसेच नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अपघात होत असून एमएसआरडीसीने ५२० किमी दरम्यानच्या सर्व इंटरचेंजेसवर समुपदेशन केंद्रे सुरू केली आहेत. दररोज हजारो वाहनांची तपासणी करून वाहनचालकांचे समुपदेशन करण्यात येत आहे.
खबरदारी तरीही.. वाहनांचे टायर फुटल्यामुळे अपघात होत असून असे अपघात रोखण्यासाठी वाहने आणि त्यांच्या टायरची तपासणी करण्यात येत आहे. मार्गिकेच्या नियमाचे पालन न करणाऱ्या दोन हजारांहून अधिक, अतिवेगात गाडी चालविणाऱ्या २५० हून अधिक, प्रतिबंधित ठिकाणी वाहन उभ्या केल्याप्रकरणी ३ हजारांहून अधिक वाहनांची तपासणी करून चालकांचे समुपदेशन करण्यात आले आहे. त्याचबरोबर अपघात झाल्यानंतर जखमींना तात्काळ मदत मिळावी यासाठी १५ अत्याधुनिक शीघ्र प्रतिसाद वाहने, १५ रुग्णवाहिका, ३० टन क्षमतेच्या १२ क्रेन आणि इतर सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.