पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लातूरप्रश्नी लक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लातूर पाणीप्रश्नी लक्ष घातले असून दर दीड दिवसाला सुमारे २५ लाख लिटर पाणी पुरविले जाणार असल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. या पाणीपुरवठय़ासाठीचा खर्च केंद्र सरकारही उचलणार असून रेल्वेकडूनही सवलत देण्याबाबत विचार सुरू आहे. कितीही निधी लागला तरी लातूरकरांना राज्य शासन पाणी पुरवेल, असे खडसे यांनी स्पष्ट केले.
तीव्र पाणीटंचाईमुळे लातूरसाठी प्रथमच मिरजहून रेल्वेच्या टँकरमधून पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर पाच लाख लिटर पाणी पुरविले जात आहे. पण पुढील काही दिवसात दर दीड दिवसाला २५ लाख लिटर पाणी पुरविण्यासाठी पावले टाकण्यात आली आहेत. मिरज येथे २५ लाख लिटर पाणी भरण्यासाठीची सर्व यंत्रणा तयार करण्यात आली असून त्यासाठी चार तासांचा कालावधी लागतो. तर लातूरला ते विहिरीमध्ये उतरविण्यासाठीही साधारणपणे तेवढाच वेळ लागतो. प्रवासासाठी आठ तास लागतात. त्यामुळे साधारणपणे तीन दिवसात दोन फेऱ्या होऊ शकतात. एकेरी रेल्वेलाइन असली तरी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या सूचनेमुळे पाण्याच्या टँकर्सच्या वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांनी लक्ष घालून प्रभू यांना सूचना केल्या आहेत आणि ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल यांच्यावर समन्वयाचे काम सोपविले आहे. त्यामुळे प्रभू व गोयल हे सातत्याने राज्य सरकारच्या संपर्कात असून सर्वतोपरी मदत पुरवीत आहेत, असे खडसे यांनी सांगितले.
हे पाणी रेल्वेच्या कोटय़ातील असून कोणाचेही पाणी कमी केलेले नाही. रेल्वेसाठी १० दशलक्ष लिटर पाणी राखीव असून त्यातील पाच दशलक्ष लिटर पाणी लातूरसाठी देण्याची तयारी आहे. पाऊस सुरू होऊन पाणी उपलब्ध होईपर्यंत लातूरला रेल्वेने पाणी पुरविता येईल. साधारणपणे १०० दिवसांपर्यंत पाणी पुरविण्यासाठी योजना तयार आहे. केंद्र सरकारही खर्चातील काही वाटा उचलणार असल्याने लवकरच त्याबाबतही चर्चा होणार आहे.
पाण्याची दुसरी गाडी रवाना
सांगली : लातूरकरांसाठी १० टँकरची ५ लाख लिटर पाणी घेऊन बुधवारी दुसरी रेल्वे मिरज स्थानकावरून रवाना करण्यात आली. टंचाईग्रस्त लातूरसाठी पाणी देण्यात कमीत कमी वेळेत प्रत्यक्ष कार्यवाही केल्याबद्दल रेल्वेच्या ऑपरेटिंग, मेकॅनिकल, विद्युत, इंजिनिअिरग आणि वाणिज्य या पाच विभागांना प्रत्येकी पाच हजार रूपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी सव्वा अकरा वाजता दुसरी पाणी गाडी लातूरसाठी रवाना करण्यात आली. या गाडीला १० वाघिणी असून, यामध्ये प्रत्येकी ५० हजार लिटर क्षमतेनुसार ५ लाख लिटर पाणी भरण्यात आले आहे.