मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ऑगस्ट २०२३ मध्ये काढण्यात आलेल्या सोडतीतील घरांच्या विक्री किंमतीच्या माध्यमातून मंडळाच्या तिजोरीत आतापर्यंत ४८९ कोटी जमा झाले आहेत. मुंबई मंडळाने ऑगस्ट २०२३ मध्ये काढलेल्या सोडतीतील ४०८२ विजेत्यांपैकी ३५०१ विजेत्यांना ४ सप्टेंबर रोजी तात्पुरते देकारपत्र पाठवून घराच्या एकूण किंमतीच्या २५ टक्के रक्कम भरण्यास ४५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. विहित मुदतीत मोठ्या संख्येने विजेत्यांनी १० वा २५ टक्के रक्कम भरली असून काहींनी १०० टक्के रक्कम भरून घराचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
हेही वाचा >>>मुंबई: साडेपाच कोटींच्या हिऱ्यांच्या अपहाराप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा
जे विहित मुदतीत घराची २५ टक्के रक्कम भरू शकलेले नाहीत, त्यांना ३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यादरम्यान ४ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबरदरम्यान घराच्या विक्री किंमतीच्या १० ते १०० टक्के रक्कमेच्या वसुलीतून मंडळाला ४८९ कोटी रुपये मिळाल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. १०० टक्के रक्कम भरण्याची मुदत संपेपर्यंत जमा रक्कमेत मोठी वाढ होईल, असे त्यांनी सांगितले. मंडळाला ४०८२ घरांच्या विक्रीतून अंदाजे दोन हजार कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. मात्र ४५० हून अधिक घरे विजेत्यांनी परत केल्याने केवळ ३५०१ विजेत्यांनाच तात्पुरते देकारपत्र पाठवून घराची रक्कम भरून घेतली जात आहे. त्यामुळे आता दोन हजार कोटींपेक्षा कमी रक्कम मंडळाच्या तिजोरीत जमा होणार आहे. तर या सोडतीत विकली न गेलेली घरे आगामी सोडतीत समाविष्ट करून ती घरे विकण्याचा मंडळाचा मानस आहे.