दोन विकासकांमधील वादात रहिवासी भरडले
सोसायटय़ांचे मालमत्तापत्रक गहाण ठेवून तब्बल २५० कोटींचे कर्ज उचलणाऱ्या मे. रुस्तमजी रिएलिटी प्रा. लि. पाठोपाठ आता याच भूखंडावरील विक्री करावयाच्या चटईक्षेत्रफळापोटी आणखी ३०० कोटी रुपये घेतल्याचे प्रकरण समोर आले आहे. या गुंतवणुकीशी मे. रुस्तमजी यांचा काही संबंध नाही. मात्र मे. रुस्तमजी यांच्या आधी या प्रकल्पाचे विकासक असलेल्या वैदेही आकाश बिल्डर्स प्रा. लि. यांच्याशी आता या रहिवाशांची लढाई सुरू झाली आहे. हा प्रकल्प गेली ११ वर्षे अपूर्ण असतानाच सोसायटीच्या भूखंडावर एकूण ५५० कोटींची उचल घेतली गेल्याचे दिसून येत आहे.
हक्काचे घर मिळावे यासाठी सुमारे ४८० रहिवासी लढत आहेत. न्यू डी एन नगर वसाहतीचा पुनर्विकास करण्यासाठी सुरुवातीला महासंघाने मे. वैदेही आकाश बिल्डर्स प्रा. लि. यांची नियुक्ती केली. या विकासकाने महापालिकेकडून आयओडीही मिळविली. इतकेच नव्हे तर या जोरावर या विकासकाने खुल्या बाजारात विक्री करावयाच्या सदनिकांच्या आरक्षणापोटी गुंतवणूकदारांकडून तब्बल ३०० कोटी रुपये घेतले. त्याचवेळी मे. वैदेही आकाश बिल्डर्स प्रा. लि. ने मे. रुस्तमजी यांच्याशीही संयुक्त विकासासाठी बोलणी सुरू केली. त्यापोटी काही रक्कमही घेतली. मात्र तरीही मे. वेदेही आकाश प्रा. लि.ने काहीही काम सुरू केले नाही. मध्यंतरी सोसायटी आणि मे. वैदेही आकाश यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आणि सोसायटीने मे. वैदेही आकाश बिल्डर्स यांची विकासक म्हणून नियुक्ती रद्द केली. २०११ मध्ये सोसायटीने मे. रुस्तमजी यांच्याशी करारनामा केला. आता रुस्तमजी यांनी रहिवाशांसाठी इमारती बांधण्यास सुरुवात केली आहे. त्याचवेळी खुल्या विक्रीसाठी असलेल्या इमारतींचे कामही सुरू केले आहे. मे. वैदेही आकाश बिल्डर्स यांच्याकडे सदनिका आरक्षणापोटी ३०० कोटी रुपये गुंतविणारे रहिवासी मात्र त्यामुळे अस्वस्थ झाले आहेत. आपल्या पैशाचे काय होणार, अशी चिंता त्यांना लागली आहे. सोसायटीने मे. वैदेही आकाश यांना काढून टाकल्यामुळे कोणाकडे दाद मागायची अशा स्थितीत हे रहिवासी आहेत. या रहिवाशांनी न्यायालयात या पोटी दावेही सादर केले आहेत. हे दावे प्रलंबित आहेत.
विकासक आणि सोसायटींचा महासंघ यांच्यातील वादामुळे बेघर झालेल्या रहिवाशांना तसेच गुंतवणूकदारांना कोणीही वाली राहिलेला नाही. मे. रुस्तमजी बिल्डर्स प्रा. लि.ने ‘रुस्तमजी इलेमेंट’ हा अप्पर जुहूमध्ये आलिशान घरांचा प्रकल्प जाहीर केल्यानंतर हे गुंतवणूकदार अधिकच हवालदिल झाले आहेत. आपल्याला कुणी वाली नाही, असे त्यांना वाटू लागले आहे.

या गुंतवणूकदारांना घर देणे ही आमची जबाबदारी आहे. सोसायटीने आपल्याला बेकायदेशीररीत्या काढून टाकले. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणाची लवकरच अंतिम सुनावणी होणार आहे. अद्यापही सोसायटीकडे पुरेसे चटईक्षेत्रफळ आहे. प्रोरेटा व फंजीबल चटईक्षेत्रफळाचा विचार केला तर या गुंतवणूकदारांना सदनिका उपलब्ध करणे कठीण नाही.
– गुरुनाथ फोंडेकर,
मे. वैदेही आकाश बिल्डर्स प्रा. लि.चे प्रमुख