मुंबई : घाटकोपरमधील माता रमाबाई नगर पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत १४ हजारांहून अधिक रहिवाशांचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून पुनर्वसन केले जाणार आहे. येत्या काही महिन्यात पुनर्विकासाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने हे काम हाती घेण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात २२ मजली आठ पुनर्वसित इमारती बांधण्यात येणार आहेत. या इमारतीत सुमारे चार हजार घरांचा समावेश आहे.

हेही वाचा >>> मुंबई : बहुमजली इमारतीच्या छताचा भास कोसळून तिघे ठार, तर तिघे जखमी

पूर्वमुक्त मार्ग प्रकल्पबाधित पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत संयुक्त भागिदारी तत्त्वावर रमाबाई आंबेडकर नगर, नालंदा नगर आणि कामराज नगर येथील १४ हजारांहून अधिक झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. यासाठी पात्रता निश्चितीचे काम सुरू असून आतापर्यंत १० हजारांहून अधिक झोपडपट्टीवासियांची पात्रता निश्चिती पूर्ण झाली आहे. यापैकी सहा हजार ५०० पात्र झोपडीधारकांबरोबर एमएमआरडीएने करारही केला आहे. पात्र झोपडीधारकांना मंगळवारपासून घरभाड्याच्या धनादेशाचे वाटपही सुरू करण्यात आले आहे. आता घरभाड्याचे धनादेश वितरीत करण्यात आलेल्या झोपडीधारकांची घरे रिकामी करून पाडण्यात येणार असून ती जागा मोकळी करून लवकरच बांधकामाला सुरुवात करण्यात येणार आहे. मोकळी करण्यात आलेली जागा एमएमआरडीएकडे वर्ग केली जाणार असून त्यानंतर एमएमआरडीएकडून प्रत्यक्ष पुनर्वसित इमारतींच्या बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे. दरम्यान, हा पुनर्विकास टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात क्लस्टर एन-१९ मधील ४०५३ जणांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> Ganesh Chaturthi 2024 : घरगुती गणेशोत्सवावर अयोध्येतील राममंदिराचा प्रभाव

क्लस्टर एन-१९ मध्ये चार हजार ०५३ झोपडीधारक असून आतापर्यंत यापैकी दोन हजार ५८० जण पात्र ठरले आहेत. एक हजार ४७३ रहिवाशांची पात्रता निश्चितीबाबत सुनावणी सुरू आहे. दरम्यान रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास प्रकल्पासाठी वास्तुशास्त्रज्ञ आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून संदीप शिकरे अँड असोसिएट ही कंपनी काम पाहत आहे. या कंपनीने पहिल्या टप्प्यातील पुनर्वसित इमारतींचा आराखडा तयार केल्याची माहिती झोपु प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या आराखड्यानुसार पहिल्या टप्प्यात २२ मजली आठ इमारती उभारण्यात येणार आहेत. क्लस्टर एन-१९ मधील पात्र रहिवाशांसाठीच्या ४ हजार घरांचा या आठ इमारतींत समावेश असणार आहे. ३०० चौरस फुटांचे १ बीएचके असे हे घर असणार आहे. भूंकप प्रतिरोधक अशा इमारतींसह येथे जलशुद्धीकरण, सांडपाणी प्रक्रिया, सौर ऊर्जा आदी यंत्रणाही उपलब्ध करण्यात येणार आहेत. तसेच खेळाची मैदाने, अंगणवाडी, आरोग्य केंद्रे, सामुदायिक सभागृहे, मंदिरे, व्यायामशाळा, शाळा, युवक केंद्रे, वाचनालये आणि सोसायटी कार्यालये यांसारख्या सोयी-सुविधांचा समावेश असणार आहे.

महिन्याभरात विकासक नियुक्तीसाठी निविदा

रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकासाच्या प्रत्यक्ष कामाला शक्य तितक्या लवकर सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. त्यानुसार तयारीला वेग देण्यात आला आहे. आता पात्र रहिवाशांना धनादेशाचे वाटप सुरू झाल्याने लवकरच झोपड्या रिकाम्या करण्यात येणार आहेत. एकीकडे झोपुकडून जमीन रिकामी करण्याचे काम सुरू असणार आहे, तर दुसरीकडे एमएमआरडीएकडून बांधकामासाठी विकासक नियुक्ती करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविला जाणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यानुसार महिन्याभरात विकासकाच्या नियुक्तीसाठी निविदा प्रसिद्ध केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

घरभाड्यापोटी ५०० कोटी खर्च

रमाबाईनगर, कामराज नगर आणि नालंदा नगर येथील पात्र रहिवाशांना १५ हजार रुपये आणि अनिवासी रहिवाशांना २५, ३० आणि ३५ हजार रुपये याप्रमाणे घरभाडे देण्यात येत आहे. दोन वर्षांचे एकत्रित घरभाडे धनादेशाद्वारे दिले जात आहे. तर पुढील एका वर्षाचे घरभाडे पोस्ट डेटेड चेकद्वारे दिले जाणार आहे. एकूणच १४ हजारांहून अधिक रहिवाशांना तीन वर्षांचे घरभाडे देण्यासाठी अंदाजे ५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ही रक्कम झोपु प्राधिकरणाने उपलब्ध केली आहे.