मुंबई : करोनाकाळात प्राणवायू निर्मिती प्रकल्प गैरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) गुन्हा (ईसीआयआर) दाखल केल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी सहा कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाखाली नुकताच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मे. हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचे रोमिन छेडा, महापालिकेचे संबंधित अधिकारी व इतरांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने रोमिन छेडा यांनाही अटक केली होती. त्याच गुन्ह्याच्या आधारावर ईडीने याप्रकरणी तपासाला सुरूवात केली आहे.
करोनाकाळात प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम अर्धवट असताना ते पूर्ण झाल्याचे सांगत मुंबई महापालिकेची सहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मेसर्स हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीची पात्रता नसतानाही या कंपनीला कंत्राट देण्यात आले. कंपनीला पालिकेची ९ रुग्णालये आणि जम्बो करोना केंद्रांमध्ये प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारणीचे कंत्राट देण्यात आले होते. कंपनीने ठरलेल्या वेळेत काम पूर्ण केले नाही, तरी २०२१ मध्ये काम पूर्ण झाल्याचे दाखवून सहा कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी भादंवि कलम ४१८, ४६५, ४६७, ४६८, ४७१, २१८, १२० (ब) व ३४ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर रोमिन यांना चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात २३ नोव्हेंबरला बोलावण्यात आले होते. त्यावेळी आर्थिक गुन्हे शाखेकडून त्यांची आठ तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर २४ नोव्हेंबरला छेडा यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता ईडीनेही याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा – मध्य रेल्वेवर लोकलचा खोळंबा
ईडीने याप्रकरणी यापूर्वी घाटकोपर येथे शोध मोहीम राबवली होती. करोनाकाळात प्राणवायूचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यावेळी प्राणवायू प्रकल्प उभारण्याचे कंत्राट छेडा यांना देण्यात आले होते. या कंत्राटामध्ये अधिक रक्कम खर्च करण्यात आल्याचा ईडीला संशय आहे. छेडा यांनी उत्तर प्रदेशातील एका संस्थेमार्फत हे काम करून घेतल्याचा संशय आहे. तसेच मानक गुणवत्तेशी तडजोड करून निकृष्ट दर्जाची उपकरणे पुरवण्यात आल्याचा संशय असून त्यानंतरही कंत्राटातील सर्व फाईलला मान्यता देण्यात आली व त्याचा मोबदलाही देण्यात आला. त्यामुळे त्या कंत्राटाशी संबंधित अधिकारीही संशयाच्या फेऱ्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या गैरव्यवहारातील रक्कम कोठे गेली याचा ईडी तपास करणार आहे.