मुंबई: मध्य रेल्वेवरील लोकल दररोज १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत असून मध्य रेल्वेचा हा लेटलतीफपणा प्रवाशांना नवा नाही. मात्र मध्य रेल्वेवरील लोकल शुक्रवारी पहाटेपासूनच ३० ते ४० मिनिटे विलंबाने धावत होत्या. परिणामी, त्याचा अनेक नोकरदार, व्यावसायिकांना बसला. या घोळामुळे १० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. दरम्यान, पहाटे धुक्यामुळे लोकल आणि रेल्वेगाड्याचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, भुसावळ विभागात शुक्रवारी पहाटे दाट धुके पडले होते. दृश्यमानता कमी झाल्यामुळे मोटरमन आणि लोको पायलटला रेल्वेमार्ग दिसणे अवघड बनले होते. रेल्वेगाड्यांच्या हेडलाईटचा प्रखर प्रकाश अपुरा पडत होता. त्यामुळे मुंबईसह इतर सर्व विभागांतील रेल्वेगाड्या कूर्मगतीने धावत होत्या. तर, मुंबई महानगरातील लोकल पहाटेपासून ३० ते ४० मिनिटे उशिराने धावत होत्या. पहाटे ४ वाजल्यापासून कसारा – टिटवाळा, कर्जत – अंबरनाथ विभागात धुक्यामुळे रेल्वे सेवा खोळंबली होती. नोकरदारांची नेहमीची लोकल विलंबाने धावत असल्याने त्यांना कार्यालयात वेळेवर पोहोचता आले नाही. तसेच लोकलच्या खोळंब्यामुळे रेल्वे स्थानक आणि लोकलमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती.

हेही वाचा… चुनाभट्टीतील ‘टाटानगर’ इमारत अखेर जमीनदोस्त; गिरणी कामगार मात्र वाऱ्यावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहाटे पडलेल्या धुक्यामुळे रेल्वेगाड्या आणि लोकलचे वेळापत्रक कोलमडले होते. शुक्रवारी दुपारी २ वाजेपर्यंत लोकल, रेल्वेगाड्यांची परिस्थिती ‘जैसे थे’ होती.. इतर विभागातून मुंबई उपनगरीय मार्गावर येणाऱ्या रेल्वेगाड्यांना प्राधान्य दिल्याने लोकल बराच वेळ एकाच ठिकाणी उभ्या होत्या. तसेच अनेक लोकल उशिराने धावत होत्या. पहाटेच्या धुक्यामुळे १० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.