मुंबई: भारतीय रेल्वेमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची गर्दी वाढत असून, या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वेमध्ये विनातिकीट प्रवास करण्याची संख्या अधिक आहे. या प्रवाशांना रोखण्यासाठी, प्रवाशांची सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि गर्दी व्यवस्थापन सुलभ करण्यासाठी पश्चिम रेल्वेने १२ रेल्वे स्थानकांवर प्रवेश नियंत्रण प्रणाली प्रकल्प राबवण्यात येणार आहे. मेट्रोप्रमाणे पश्चिम रेल्वेवर हा प्रकल्प राबविला जाणार आहे. पश्चिम रेल्वेवरील १२ स्थानकांची नावे रेल्वे मंडळाकडे पाठवण्यात आली आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय रेल्वेवर चेंगराचेंगरीच्या घटना घडत आहेत. पश्चिम रेल्वेवरील वांद्रे टर्मिनस, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीची घटना घडली होती. तसेच विनातिकीट आणि अनियमित रेल्वे तिकीटाद्वारे अनेक प्रवासी रेल्वे प्रवास करतात. त्यामुळे रेल्वेच्या महसुलावर परिणाम होतो. यासह तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होतो. त्यामुळे देशभरातील सर्व रेल्वे विभागांना जास्त रेल्वे वाहतूक असलेल्या १० ते १२ स्थानकांची नावे पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या. रेल्वे मंडळाच्या निर्देशानंतर पश्चिम रेल्वेने मुंबई उपनगरीय रेल्वेवरील ३ आणि गुजरातमधील ९ रेल्वे स्थानकांची नावे रेल्वे मंडळाकडे पाठवली आहेत. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील अंधेरी, बोरिवली आणि वांद्रे टर्मिनस या प्रमुख स्थानकांचा समावेश आहे.

तर, गुजरातमधील उधना, वापी, सुरत, अहमदाबाद, असारवा, उज्जैन, वडोदरा, साबरमती आणि सिहोर या स्थानकांचा समावेश आहे. तिकीट स्कॅन केल्यानंतर प्रवाशांना मेट्रोमधून प्रवास करता येतो. त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकावर प्रवेश करण्याच्या ठिकाणी ही सुविधा उभारण्याची योजना आहे. यामुळे अनधिकृत प्रवेश रोखणे आणि स्थानक सुरक्षेत लक्षणीय सुधारणा होणार आहे, असे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.

रेल्वे मंडळाने प्रायोगिक तत्त्वावर या प्रकल्पाची योजना तयार केली आहे. पश्चिम रेल्वेवरील उपनगरीय रेल्वेवरील अंधेरी, बोरिवली, वांद्रे टर्मिनस आणि पश्चिम रेल्वेवरील गुजरातमधील ९ स्थानकांवर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. परंतु, याबाबत रेल्वे मंडळ अंतिम निर्णय घेणार आहे, असे पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. हा प्रकल्प सध्या प्राथमिक टप्प्यात आहे. फक्त स्थानकांची नावे मंडळाकडे सादर केली आहेत. तरीही हा प्रस्ताव रेल्वे पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि जास्त गर्दी असलेल्या ठिकाणी प्रवाशांची सुरक्षितता वाढविण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.