मुंबई : तीन महिन्यांच्या कुत्र्याच्या पिल्लाला इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून फेकल्याने पवईतील एका सुरक्षा रक्षकाला नोकरी गमवावी लागली. याशिवाय त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्याने शनिवारी सकाळी पवईमधील एमराल्ड आईल इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून कुत्र्याच्या पिल्लाला खाली फेकले होते.
इमारतीतील रहिवाशांनी त्वरित कुत्र्याच्या पिल्लाला रुग्णालयात दाखल करून उपचार केल्याने त्याचा जीव वाचला. मात्र, पिल्लाला गंभीर दुखापत झाली आहे.
पवईच्या साकीविहार मार्गावर टॉवर पार्क या संकुलात एमराल्ड आईल ही इमारत आहे. आरोपी कैलास गुप्ता (५६) या इमारतीत सुरक्षा रक्षकाचे काम करतो. शनिवारी सकाळी ९.३० च्या सुमारास त्याने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून कुत्र्याच्या पिल्लाला खाली फेकले. यामुळे कुत्र्याचे पिल्लू जखमी झाले. जखमी पिल्लाला प्राण्यांच्या डॉक्टरांकडे नेण्यात आले. उंचावरून खाली पडल्याने पिल्लाला गंभीर दुखापत झाली आहे. या इमारतीत राहणारे कैलास धनाजी (४०) यांनी याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुप्ताविरोधात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी गुप्तावर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्याच्या कलम ११ (१) तसेच प्राण्यांच्या जिवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२५ अंतर्गत गुन्हा दाखल केला. इमारतीच्या पदाधिकाऱ्यांनी सुरक्षा रक्षक गुप्ताला कामावरून काढून टाकले.