लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : मुघल बादशाह औरंगजेबबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी यांना अटकेपासून संरक्षण देताना सत्र न्यायालयाने त्यांची कानउघाडणी केली आहे. ‘तुमच्यासारख्या ज्येष्ठ राजकारण्याचे कोणतेही बेजबाबदार विधान दंगली भडकवू शकते. त्यामुळे, प्रसिद्धीमाध्यमांना मुलाखती देताना संयम आणि सावधगिरी बाळगावी,’ अशी ताकीद न्यायालयाने आझमी यांना दिली.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. जी. रघुवंशी यांनी आझमी यांना मंगळवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. न्यायालयाच्या तपशीलवार आदेशाची प्रत गुरुवारी उपलब्ध झाली. त्यात, न्यायालयाने आझमी यांची कानउघाडणी करताना त्यांना संयमाने वागण्याची ताकीद दिली. आझमी यांनी प्रसिद्धीमाध्यमांना मुलाखत देताना केलेल्या काही विधानांशी संबंधित हा गुन्हा आहे आणि त्यासाठी पोलीस कोठडी देऊन चौकशी करण्याची आवश्यकता नाही.

तसेच, आझमी हे एक राजकारणी आणि व्यापारी आहेत व पळून जाणे अशक्य आहे हे लक्षात घेऊन त्यांना अटकेपासून संरक्षण दिले जात आहे. तथापि, आझमी यांनी प्रसिद्धी माध्यमांना मुलाखती देताना स्वतःवर संयम बाळगण्याची ताकीद आपण त्यांना देऊ इच्छितो, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. त्याच वेळी, आझमी हे जबाबदारीने वागतील, अशी अपेक्षाही न्यायालयाने व्यक्त केली.

दुसरीकडे, प्रकरणाचा तपास प्राथमिक टप्प्यावर असून आझमी यांनी दिलेल्या मुलाखतीवर भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे न्यायालयाने म्हटले. परंतु, तपास अधिकाऱ्याकडे कथित मुलाखतीची चित्रफीत नव्हती आणि ती न पाहताच गुन्हा नोंदवणे हे आश्चर्यकारक असल्याचे ताशेरे न्यायालयाने पोलिसांवर कृतीवर बोट ठेवताना ओढले.

दरम्यान, औरंगजेबबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकऱणी आझमी यांच्याविरोधात मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे, आझमी यांनी सत्र न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामिनासाठी तो अर्ज केला होता. सत्र न्यायालयाने त्यांच्या अर्जाची दखल घेऊन त्यांना अटकेपासून दिलासा दिला. त्याच वेळी १२ ते १५ मार्चदरम्यान तपास अधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abu azmi warned by court to exercise restraint while giving interviews mumbai print news mrj