लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : प्लास्टिकच्या पिशव्या, एकदा वापरून फेकून दिली जाणारी ताटे, चमचे, डबे यांच्यावरील कारवाईला मुंबईत पुन्हा एकदा वेग येणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार मुंबई महानगरपालिका पुन्हा या कारवाईसाठी पथके तयार करणार आहे. या पथकात पोलीस आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात येणार असून मुंबईत २१ ऑगस्टपासून दंडात्मक कारवाईला सुरुवात होणार आहे.

राज्य सरकारने २०१८ मध्ये संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदी लागू केली होती. त्यानंतर महानगरपालिकेनेही प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीस सुरुवात केली होती. प्रतिबंधित प्लास्टिक विरोधातील कारवाईसाठी पथके तैनात केली होती. मात्र टाळेबंदीच्या काळात दोन वर्षे प्लास्टिक बंदीची कारवाई पूर्णपणे थंडावली होती. मात्र करोना संसर्ग आटोक्यात आल्यानंतर महानगरपालिकेने जुलै २०२२ पासून पुन्हा एकदा प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू केली होती. तरीही त्या कारवाईला फारसा वेग नव्हता. आता मात्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कारवाईत पुढाकार घेण्याचे ठरवले आहे. या कारवाईत पोलीस आणि एमपीसीबीने महानगरपालिकेच्यासोबत सहभागी होण्याचे ठरवले आहे. त्यानुसार महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाने कारवाईसाठीचा आराखडा तयार केला आहे. त्यामुळे या कारवाईला आता वेग येण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा-मुंबई: चेंबूरमध्ये मोटारगाडीची विजेच्या खांबाला धडक, दोन महिलांसह पाचजण जखमी

या कारवाईसाठी प्रत्येक प्रशासकीय विभाग कार्यालयाच्या हद्दीत पाच अधिकाऱ्यांचे पथक तैनात करण्यात येणार आहे. यात महानगरपालिकेचे तीन, एमपीसीबी आणि पोलीस दलातील प्रत्येकी एका अधिकाऱ्याचा समावेश करण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त संजोग कबरे यांनी दिली. एमपीसीबीने २५ अधिकाऱ्यांची नावे महानगरपालिकेला कळवली असून त्यानुसार पथके तयार करण्यात येणार आहेत. तसेच २१ ऑगस्टपासून प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात होईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

आणखी वाचा-मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांत तोकड्या मनुष्यबळामुळे रुग्णसेवेवर परिणाम

हे पथक दुकाने, मंडया, फेरीवाले यांच्याकडील प्लास्टिकच्या पिशव्यांवर कारवाई करणार आहे. तसेच प्रतिबंधित प्लास्टिकच्या वस्तू, पॅकिंगसाठी वापरले जाणारे डबे, एकदाच वापरून फेकून दिल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू यांची साठवणूक करणारे, तसेच विक्रेत्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच ग्राहकांकडे प्रतिबंधित प्लास्टिक आढळल्यास त्यांना समज दिली जाणार आहे.असा आहे दंडप्रतिबंधित प्लास्टिक आढळल्यास प्रथम गुन्ह्यासाठी पाच हजार रुपये, दुसऱ्या गुन्ह्यासाठी १० हजार रुपये, तिसऱ्या गुन्ह्यासाठी २५ हजार रुपये दंड व ३ महिन्यांची कैद अशी शिक्षा आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accelerating action against plastic police and pollution control board officers in the municipal team mumbai print news mrj