Mumbai Train Blasts Case: मुंबईत २००६ साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात उच्च न्यायालयाने २१ जुलै २०२५ रोजी महत्त्वाचा निकाल दिला. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील १२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यापूर्वी तब्बल एक दशक तुरूंगात घालवलेल्या शिक्षक डॉ. वाहिद शेख यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाकडे भरपाईसाठी अपील केले आहे. नऊ वर्षांच्या चुकीच्या कारावासासाठी नुकसान भरपाई म्हणून ९ कोटी रुपयांची मागणी त्यांनी केली आहे.
११ जुलै २००६ रोजी मुंबईतील उपनगरीय रेल्वेगाड्यांच्या प्रथम श्रेणीच्या डब्यांत साखळी बॉम्बस्फोट झाले होते. यामध्ये १८० हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले होते आणि शेकडो लोक जखमी झाले होते. २०१५ साली विशेष न्यायालयाने डॉ. वाहिद शेक यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्याआधी त्यांनी नऊ वर्ष कारावासात घालवली होती.
यावर्षी जुलै महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने २००६ च्या रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणात पूर्वी दोषी ठरवलेल्या सर्व १२ जणांची निर्दोष मुक्तता केली. संशयाच्या पलीकडे जाऊन आरोपींवरील गुन्हा सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याची टिप्पणी न्यायालयाने व्यक्त केली.
उच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाची वाट पाहत असलेल्या वाहिद शेख यांनी शुक्रवारी आपले औपचारिक अपील दाखल केले. बऱ्याच यातना सहन करूनही मी न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवला. शेवटी न्यायपालिकेने माझे निर्दोषत्व मान्य केले, अशी प्रतिक्रिया शेख यांनी दिली.
माझ्या आयुष्यातील महत्त्वाची ९ वर्ष वाया गेली. या काळात भरून न येणारे नुकसान झाले. यासाठी ९ कोटी रुपयांची भरपाई मागत असल्याचे त्यांनी सांगितले. द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीत नुकसान भरपाईची शेख यांनी दिलेली कारणे नमूद करण्यात आली आहेत. पोलीस कोठडीत असताना शारीरिक आणि मानसिक छळ, वयवर्ष २८ ते ३७ या तारूण्य काळाचे नुकसान, आरोग्याच्या कायमस्वरुपी भेडसावणाऱ्या समस्या उद्भवल्या, कुटुंबाची भावनिक आणि आर्थिक होरपळ, वडिलांचा मृत्यू आणि आईचे मानसिक आरोग्य बिघडणे अशा स्वरुपाचे वैयक्तिक नुकसान झाल्याचे शेख यांनी सांगितले.
वाहिद शेख यांनी पुढे म्हटले की, तुरूंगातून बाहेर आल्यानंतर वैद्यकीय आणि संबंधित खर्चामुळे त्यांच्यावर ३० लाख रुपयांचे कर्ज झाले आहे. माझ्या आयुष्यातील महत्त्वाची १० वर्ष वाया गेली. आता मला भक्कम पाठिंबा मिळाल्याशिवाय आयुष्यात पुन्हा उभे राहता येणार नाही, असेही ते म्हणाले.