मुंबई : बहुचर्चित धारावी पुनर्विकास प्रकल्प राबवित असलेल्या अदानी समुहाच्या नवभारत मेगा डेव्हलपर्सने आतापर्यंत या प्रकल्पात साडेचार हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. या प्रकरणी सादर करण्यात आलेल्या बृहद्आराखड्यात ही माहिती देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी आतापर्यंत धारावी परिसराबाहेर ५४१ एकर भूखंड वितरीत केला असला तरी प्रत्यक्षात ६३ एकर भूखंड ताब्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी जानेवारी २०२५ मध्ये प्रारंभ पत्र देण्यात आले आहे. रेल्वेच्या अखत्यारितील ४६ एकरपैकी २७ एकर भूखंड ताब्यात आला असून त्यापैकी सात एकर भूखंडावर रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी वसाहती व इतर सुविधा उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. प्रत्यक्षात पुनर्वसनाच्या इमारतींना सुरुवात करण्यात आलेली नाही. रेल्वे वसाहतींचे काम पूर्ण झाल्यानंतरच पुनर्वसनाच्या इमारतींच्या कामाला सुरुवात होणार आहे. ९५ हजार कोटींच्या या प्रकल्पात बांधकामासाठी २३ हजार ८०० कोटी रुपये येत्या दोन वर्षांत खर्च केले जाणार आहे.
धारावी परिसरातील २५१ हेक्टरपैकी फक्त १०८ हेक्टर भूखंडावरच प्रत्यक्षात पुनर्विकास होणार आहे. या भूखंडापैकी ४७ हेक्टर भूखंड पुनर्वसनासाठी तर ४७ हेक्टर भूखंड विक्रीसाठी वापरला जाणार आहे. या प्रकल्पात पुनर्वसनाअंतर्गत फक्त ५८ हजार सदनिका तर औद्योगिक व व्यावसायिक अशा साडेतेरा हजार सदनिका अशा पुनर्वसनाच्या एकूण ७२ हजार सदनिका उभारल्या जाणार आहेत. त्यामुळे सर्वच पात्र धारावीकरांनाच धारावीत घर मिळेलच, याची शक्यता नसल्याचे सांगितले जाते. सध्या सुरु असलेल्या सर्वेक्षणानुसार, धारावी परिसरात सव्वा लाख इतकी बांधकामे असतील, असा अंदाज आहे. आतापर्यंत एक लाख एक हजार ४९९ रहिवाशांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण झाले आहे तर ५६ हजार ९७१ रहिवाशांनी संपूर्ण कागदपत्रे तर २२ हजार ४८४ रहिवाशांनी अंशत: कागदपत्रे सादर केली आहेत. १३ कंपाऊंड, कुंभारवाडा आणि खासगी भूखंडावरील झोपडपट्टीचे सर्वेक्षण शिल्लक असल्याचेही या सूत्रांनी सांगितले.
अपात्र धारावीकरांसाठी धारावीबाहेर कुर्ला डेअरी (२१ एकर), मुलुंड (५८ एकर), देवनार (१२४ एकर), अक्सा, मालवणी (१४० एकर), कांजुरमार्ग (१२० एकर) आणि भांडूप (७६ एकर) येथे भूखंड वितरीत झाले आहे. त्यापैकी कुर्ला डेअरी व मुलुंड येथील एकूण ६३ एकर भूखंडाचा ताबा देण्यात आला आहे. या भूखंडावर धारावीकरांसाठी भाडे तत्त्वावरील घरे बांधली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.