मुंबईत मेट्रो प्रकल्पांची कामे सुरु असून या कामामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. वांद्रे पश्चिम लिंकिंग रोड येथे मेट्रो मार्गिकेच्या कामामुळे रस्त्यावर खड्डे पडले असून चिखल झाला आहे. त्याचा त्रास वाहनचालक आणि पादचाऱ्यांना होत आहे. तेव्हा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) याकडे लक्ष द्यावे. कंत्राटदारांच्या फायद्यासाठी शहराचे नुकसान नको असे म्हणत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी एमएमआरडीएला  लक्ष्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> VIDEO : जयपूर-मुंबई पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये नेमकं काय घडलं? एसी कोच अटेंडंटने सांगितला थरारक प्रसंग; म्हणाले, “जवान…”

पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांचा  वाहतुकीला फटका बसतो. वाहतूक कोंडी होते. पावसाळ्यात खड्ड्यांमुळे मुंबई महानगर पालिकेला टीकेला सामोरे जावे लागते. अनेकदा खड्डे आणि रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत एमएमआरडीएकडे बोट दाखवले जाते. त्यानुसार आदित्य ठाकरे यांनीही आता खड्ड्यांवरून एमएमआरडीएला लक्ष्य केले आहे. आदित्य ठाकरे यांनी रविवारी एक ट्विट करून मेट्रोच्या कामामुळे रस्ते खराब होत असल्याचा आरोप केला आहे. वांद्रे पश्चिम येथील लिकिंग रोडचे उदाहरणही त्यांनी दिले आहे. लिकिंग रोड येथे एमएमआरडीएकडून मेट्रो २ ब (अंधेरी पश्चिम ते मानखुर्द, मंडाले) मार्गिकेचे काम सुरु आहे.

हेही वाचा >>> “इतरांना JEE Advance चे गुण विचारू नका, जातीभेदाला खतपाणी मिळेल”, IIT मुंबईच्या विद्यार्थ्यांना सूचना!

लिंकिंग रोडवर पट्ट्यात मेट्रोच्या कामामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत, सर्वत्र चिखल झाला आहे. अनेक ठिकाणी बॅरीकेट्स लावण्यात आले आहेत, काही ठिकाणी बॅरीकेट्स असे बाजुला टाकण्यात आले आहेत. याचा फटका वाहनचालक-प्रवासी आणि पादचाऱ्यांना बसत आहे. त्यांना धोका निर्माण झाला आहे. एमएमआरडीएने याकडे तात्काळ लक्ष द्यावे असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. कंत्राटदारांच्या फायद्यासाठी मुंबई शहराचे नुकसान नको असेही त्यांनी नमूद केले आहे. आदित्य ठाकरे यांच्या ट्विटला उत्तर देताना एमएमआरडीएने मेट्रो २ ब मार्गिकेतील खांबांच्या पायाभरणीचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. तर बॅरीकेट्स काढण्यात आल्याचा दावा केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray targeted mmrda for due to metro works mumbai print news zws