मुंबई : मालाड परिसरातील मढ, मार्वे, एरंगळ परिसरातील अनधिकृत स्टुडिओवरून आता शिंदे गटाने माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. एक हजार खोके एकदमच ओक्के अशी घोषणा समाजमाध्यमांवरून दिली आहे. आदित्य ठाकरे यांचा एक हजार कोटी रुपयांचा स्टुडिओ घोटाळा असेही या मजकूरात म्हटले आहे. अनधिकृत स्टुडिओवरून आधी भारतीय जनता पक्षाने शिवसेनेवर आरोप केले होते त्यात सूर मिसळत आता शिंदे गटानेही आरोप सुरू केले आहेत.
मालाड येथील मढ, मार्वे येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या स्टुडिओवरून काही दिवसांपूर्वी राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. या ठिकाणी असलेल्या ४९ स्टुडिओबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. भाजपने या विषयावरून शिवसेनेला कोंडीत पकडले होते. गैरव्यवहार करून या स्टुडिओची उभारणी करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला होता. तसेच या परिसरात माजी मंत्री आदित्य ठाकरे व अस्लम शेख यांनी भेटी का दिल्या हे शोधून काढण्याची मागणीही केली होती. हा वाद पेटल्यानंतर गेल्या आठवड्यात पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. आयुक्तांनी उपायुक्त हर्षद काळे यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली व त्यांना चार आठवड्यात अहवाद सादर करण्याचे आदेश दिले होते. अद्याप चौकशीचा कालावधी संपलेला नाही. मात्र शिंदे गटाने आता आदित्य ठाकरे यांना त्यावरून लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे.
शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी याबाबत समाज माध्यमांवर मजकूर लिहीला आहे. करोनाच्या काळात सामान्य मुंबईकर जगण्यासाठी संघर्ष करीत होता. त्याचवेळी मुंबई सर्व नियम धाब्यावर बसवून सुमारे एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा सुरू होता, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यात आदित्य ठाकरे यांचे छायाचित्र टाकून स्टुडिओ घोटाळा असेही लिहिले आहे. पावसाळी अधिवेशनावेळी शिवसेनेच्या आमदारांनी शिंदे गटातील आमदारांना उद्देशून केलेली पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा खूप गाजली होती. त्याच धर्तीवर एक हजार खोके एकदमच ओके अशी नवीन घोषणा शिंदे गटाने केली आहे.