मुंबई : महाविद्यालयांना मान्यता मिळण्याच्या प्रक्रियेमुळे रखडलेल्या औषधनिर्माणशास्त्र पदविका (डी. फार्म) अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला तंत्र शिक्षण संचालनालयाकडून अखेर सुरूवात करण्यात आली. यंदा प्रवेश प्रक्रिया चार फेऱ्यांमध्ये होणार असून, त्यानंतर संस्थास्तरिय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. डी. फार्म अभ्यासक्रमासाठी ७ ऑक्टोबर रोजी पहिली यादी जाहीर करण्यात येणार आहे.
राज्यातील औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयांची नोंदणी प्रक्रिया लांबल्याने यंदा पदवी व पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला विलंब झाला आहे. त्यातच भारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषदेच्या निकषांची महाविद्यालयांकडून पूर्तता करण्यात येत नसल्याने राज्यातील ८९ महाविद्यालयांवर कारवाई करून त्यांना प्रवेश प्रक्रियेतून बाहेर काढण्यात आहे. त्यानंतर आता पदवी अभ्यासक्रमापाठोपाठ तंत्र शिक्षण संचालनालयाने पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेलाही सुरूवात केली आहे.
३४ हजार ९३४ विद्यार्थ्यांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना १ ते ४ ऑक्टोबरदरम्यान विद्यार्थी ऑनलाइन पसंतीक्रम भरावे लागणार आहेत. यानंतर ७ ऑक्टोबरला पहिली यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर ८ ते १० ऑक्टोबरदरम्यान जागा स्वीकृती व प्रवेश निश्चिती करावी लागणार आहे.
दुसरी फेरी ११ ऑक्टोबरपासून सुरू होऊन १७ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल. तिसरी फेरी १८ ते ३० ऑक्टोबरदरम्यान होणार असून, चौथी व अंतिम फेरी ३१ ऑक्टोबरपासून १० नोव्हेंबरपर्यंत होणार आहे. यापुढे संस्थास्तरिय प्रवेश ११ ते १५ नोव्हेंबरदरम्यान घेता येईल. तर उशिरा रद्द झालेल्या प्रवेशानंतरचे समायोजन १६ व १७ नोव्हेंबरदरम्यान केले जाणार आहे. शुल्क परताव्यासह प्रवेश रद्द करण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे. तर १७ नोव्हेंबर हा प्रवेशाचा शेवटचा दिवस असणार आहे.