लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाने (महारेरा) नियमांचे पालन व करणाऱ्या विकासकांवर कारवाई करण्याचे ठरविले असून गृहनिर्माण प्रकल्पांच्या जाहिरातींमध्ये क्यूआर कोड न छापणाऱ्या राज्यातील ७४ विकासकांवर कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. अशी एकूण १०७ प्रकरणे महारेराच्या निदर्शनास आली आहेत. यातील २५ प्रकरणांत सुनावणी झाली असून सही प्रकरणांत एकूण दोन लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. उर्वरित प्रकरणी सुनावणी आणि दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. शिवाय उर्वरित ३३ विकासकांना कारणे दाखवा नोटिसा पाठवण्यात येणार आहेत.

महारेराने एक ऑगस्टपासून गृहनिर्माण प्रकल्पांच्या सर्व प्रकारच्या जाहिरातींसोबत क्यूआर कोड छापणे बंधनकारक केले आहे. वर्तमानपत्रांतील जाहिरातींशिवाय ऑनलाइन, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आदी समाज माध्यमांवरील जाहिरातींवरही लक्ष ठेवून आहे. ऑनलाइन आणि फेसबुकवरील जाहिरातींमध्ये क्यूआर कोड न वापरण्याचे प्रमाण लक्षणीय असल्याचे आढळून आले आहे. याशिवाय ऑनलाइन आणि फेसबुकवरील जाहिरातींच्या अनुषंगाने दिलेल्या नोटिशींना उत्तर देताना, या जाहिराती आम्ही दिलेल्या नाही, अशी भूमिका काही विकासकांनी घेतली. त्यामुळे परवानगीशिवाय अशा जाहिराती करणाऱ्यांविरुद्ध सायबर गुन्हे विभागाकडे तक्रार दाखल करण्याचे आदेश संबंधित विकासकांना देण्यात आले आहेत.

आणखी वाचा-स्किझोफ्रेनियाग्रस्त महिलेचे शंभरहून अधिक वेळा नियंत्रण कक्षाला दूरध्वनी

प्रत्येक विकासक आपल्या प्रकल्पाच्या एजंटची माहिती संकेतस्थळावर देत असतात. समाज माध्यमांवरील या जाहिरातींबाबत दक्षता बाळगून खरेदीदारांनी संबंधित विकासकाच्या संकेतस्थळावरून खात्री करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्राहकांनी फसवणूक टाळण्यासाठी संबंधित विकासकांच्या संकेतस्थळावरून खात्री करून घ्यावी, असे आवाहनही महारेराने केले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ads without qr code 74 show cause notices to developers mumbai print news mrj