मुंबई : महसूल व वन विभागाने महाराष्ट्राचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनदल प्रमुख) पदाच्या नियुक्तीबाबतचा शासन आदेश केवळ इंग्रजी भाषेत प्रकाशित केला होता. वनविभागाच्या या निर्णयावर मराठी एकीकरण समितीने आक्षेप नोंदवत संबंधित आदेश मराठी भाषेत प्रसिद्ध करण्याची मागणी केली होती. त्यानुसार, आता महसूल व वन विभागाने मराठीत शासन आदेश प्रसिद्ध केला.
महसूल व वन विभागाने ३० सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनदल प्रमुख) पदाच्या नियुक्तीबाबत शासन आदेश प्रसिद्ध केला होता. मात्र, तो केवळ इंग्रजीतच प्रसिद्ध केल्याने मराठी एकीकरण समितीचे उपाध्यक्ष आनंदा पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती.
तसेच, हा शासन आदेश मराठीत प्रसिद्ध करण्याच्या मागणीसाठी महसूल व वन विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव व मराठी भाषा विभागाचे सचिव आदींना ई – मेलद्वारे पत्र पाठविले होते. राज्यातील बहुसंख्य मराठी भाषिकांना अधिकृत राजभाषेत माहिती मिळणे अनिवार्य असल्यामुळे शासन आदेश मराठीत प्रसिद्ध करणे गरजेचे असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले होते. त्यानंतर अखेर ३ ऑक्टोबर रोजी महसूल व वन विभागाने संबंधित शासन आदेश मराठीत प्रसिद्ध केला.
राज्यातील नागरिकांना त्यांच्या राजभाषेतून माहिती उपलब्ध न करून देणे हे महाराष्ट्र राजभाषा धोरणाचे उल्लंघन आहे. महाराष्ट्र शासन हे राज्यातील बहुसंख्य मराठी भाषिक जनता लक्षात घेऊन सर्व शासन आदेश मराठीतच प्रकाशित करणे कायदेशीररित्या बंधनकारक असल्याचे स्मरण पाटील यांनी पत्राद्वारे करून दिले होते. तसेच, महसूल व वन विभागाने काढलेला शासन आदेश तात्काळ मराठी भाषेत प्रकाशित करावा. तसेच भविष्यातील सर्व शासन आदेश मराठी भाषेतच प्रकाशित करावेत, अशी मागणी मराठी एकीकरण समितीचे आनंद पाटील यांनी केली होती.