मुंबई : गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत गर्दीचे नियोजन करण्यासाठी मुंबई पोलिसांनी पहिल्यांदा ‘एआय’ कॅमेऱ्याचा वापर केला होता. हा प्रयोग यशस्वी ठरला असून या कॅमेऱ्यामुळे गिरगाव चौपाटीवर ४ लाख भाविकांच्या गर्दीचे नियोजन करणे शक्य झाले.

यंदा गणेशोत्सव विसर्जनाच्या वेळी मुंबई पोलिसांनी गर्दीचे नियोजन करण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता अर्थात ‘एआय’ तंत्रज्ञान असलेल्या कॅमेऱ्याचा वापर केला होता. यासाठी गिरगाव चौपाटीवर १०० हून अधिक एआय तंत्रज्ञानाचे कॅमेरे बसविण्यात आले होते.

एआय कॅमेऱ्याचा प्रयोग यशस्वी

विसर्जनाच्या वेळी गिरगाव चौपाटीवर पहिल्यांदा हा प्रयोग राबविला होता. तो यशस्वी झाला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनासाठी तब्बल २० लाख भाविकांनी गिरगाव चौपाटीवर हजेरी लावली होती. पोलिसांनी प्रथमच वापर केलेल्या ‘एआय’ प्रणालीमुळे भाविकांची संख्या समोर आली असून यामुळेच चेंगराचेंगरी सारखी घटना रोखण्यात पोलिसांना यश आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

असे झाले नियोजन

‘एआय’चा खूप मोठा उपयोग झाला. ‘एआय’च्या माध्यमातून या कॅमेरा गर्दी टिपत होता. क्षमतेपेक्षा गर्दी अधिक होत असल्याचा अलर्ट ‘एआय’कडून मिळताच त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून गर्दी नियंत्रणात आणली गेली. ‘एआय’ च्या माध्यमातून संबंधित मंडळाची मिरवणूक कुठे आहे ? मिरवणुकीत किती गर्दी आहे ? कोणीही संशयास्पद नाही ना यावर नजर ठेवून नियोजन करण्यात आले. त्यामुळे कुठेही कोंडी झाली नाही. गिरगाव चौपाटीवर एकाच वेळी चार लाख भाविकांच्या गर्दीचे नियोजन करणे पोलिसांना ‘एआय’मुळे सहज शक्य झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.

बेपत्ता २४ मुलांना शोधण्यात यश

केवळ गर्दीचे नियोजनच नाही, तर पार्किंग व्यवस्था केलेल्या ठिकाणांचा वापर कसा होतोय याची माहितीही ‘एआय’च्या मदतीने मिळत होती. विसर्जनादरम्यान २४ लहान मुले बेपत्ता झाली होती. त्यांना शोधून काढण्यात ‘एआय’ची मदत झाली. मुंबईतील सुमारे ७४५ बड्या आणि प्रसिद्ध मंडळाच्या मिरवणुकांचे नियोजन देखील ‘एआय’ च्या माध्यमातून करण्यात आले. संशयास्पद व्यक्ती निर्माल्य कलशामध्ये काही घातक वस्तू आणून टाकत नाही ना, यावरही एआयच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येत होती.

‘लालबागच्या राजा’च्या २५ लाख भाविकांची नोंद

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात एआय कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला होता. सुमारे २५ लाख भाविकांची नोंद या कॅमेऱ्याद्वारे करण्यात आली. याशिवाय ५० कुख्यात गुन्हेगारांचे चेहरे टिपण्यात आले होते. मराठा आंदोलनाच्या वेळी मुंबईत २७ हजार आंदोलक आल्याची नोंद एआय कॅमेऱ्याने केली होती.