मुंबई : आर्यन खान याच्या सुटकेसाठी अभिनेता शाहरूख खान याच्याकडे २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपाप्रकरणी केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) पश्चिम क्षेत्राचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधातील आर्थिक गैरव्यवहाराचा तपास दिल्ली मुख्यालयाकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती सक्तवसुली संचालनालयानेही (ईडी) मंगळवारी उच्च न्यायालयात दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ईडीने दाखल केलेला आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा रद्द करण्याच्या आणि याचिका प्रलंबित असेपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्याच्या मागणीसाठी वानखेडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावेळी, ईडीतर्फे वकील हितेन वेणेगावकर यांनी उपरोक्त माहिती न्यायमूर्ती प्रकाश नाईक आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठाला दिली. तसेच, वानखेडे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणी दाद मागण्याची सूचना केली. परंतु, कारवाईचे मूळ हे मुंबईत आहे. त्यामुळे, ईडी प्रकरणाचा तपास दिल्ली मुख्यालयाकडे वर्ग करू शकत नाही, असा दावा वानखेडे यांच्यातर्फे वकील आबाद पोंडा यांनी केला व ईडीच्या निर्णयाला विरोध केला. त्याचप्रमाणे, तपास वर्ग मुख्यालयाकडे वर्ग करण्याची कृती योग्य की अयोग्य यावर सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाकडे केली.

हेही वाचा – राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे उपोषण सुरू

चौकशी मुख्यालयाकडे हस्तांतरित करण्याची ईडीची कृती वाईट हेतूने असल्याचा दावाही पोंडा यांनी तत्पूर्वी केला. गेल्या शनिवारपर्यंत ईडीतर्फे प्रकरणाशी संबंधित एनसीबीच्या काही अधिकाऱ्यांना समन्स बजावण्यात आले आणि मुंबई कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. वानखेडे यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर मात्र प्रकरण दिल्लीतील मुख्यालयाकडे वर्ग करण्यात आल्याचेही पोंडा यांनी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला. वानखेडे यांनी सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊ नये हे सुनिश्चित करण्यासाठी हे करण्यात आलेले असल्याचा दावाही करण्यात आला.

या दाव्याला विरोध करताना, प्रशासकीय कारणास्तव चौकशी दिल्लीतील मुख्यालयाकडे वर्ग करण्यात आल्याचे ईडीतर्फे वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले. संपूर्ण प्रकरण आधीच दिल्लीला हस्तांतरित करण्यात आले आहे. कारवाईचे संपूर्ण कारण तेथेच असल्याने प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रेही दिल्लीला पाठवण्यात आल्याचे ईडीच्यावतीने न्यायालयाला सांगण्यात आले. दोन्ही बाजूचा युक्तिवाद थोडक्यात ऐकल्यानंतर न्यायालयाने वानखेडे यांच्या दोन्ही याचिकांवर १५ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेतली जाईल, असे स्पष्ट केले व ती स्थगित केली.

हेही वाचा – मुंबई : पुढील एक महिना विशेष तिकीट तपासणी मोहीम, प्रवाशांनी तिकीट काढून प्रवास करण्याचे आवाहन

आर्यन खान याच्या सुटकेसाठी २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपाप्रकरणी सीबीआयने वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्याच आधारे ईडीने वानखेडे यांच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Allegation of seeking bribe for aryan khan release financial misappropriation case against sameer wankhede sent to delhi headquarters mumbai print news ssb
First published on: 13-02-2024 at 23:13 IST