मुंबई : थोडासा पाऊस पडला तरी लगेचच पाणी भरण्यासाठी प्रसिद्ध असलेला अंधेरी सब वे आता समाजमाध्यमांवरही चेष्टेचा विषय बनला आहे. पाणी तुंबलेल्या अंधेरी सब वेची छायाचित्रे आणि त्यावरील एका ओळीवरून चर्चा रंगली आहे. अंधेरी सब वेवर लावण्यात आलेला एक जाहिरात फलक समाजमाध्यमांवर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘डुबना हैं तो प्यार में डूबो…, यहा नही…’ असा संदेश या जाहिरात फलकावर नमुद करण्यात आला आहे. हे छायाचित्र आणि ही जाहिरात चांगलीच चर्चेत आहे.
थोडासा पाऊस पडला की पश्चिम उपनगरातील अंधेरी सब वेमध्ये पाणी तुंबते आणि हा भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद करावा लागतो. गेल्या कित्येक वर्षांत या समस्येवर मुंबई महापालिकेला तोडगा काढता आलेला नाही. हिंदमातामध्ये उपाययोजना करून अखेर पाण्याचा निचरा करण्यात पालिकेला काही अंशी यश आले. पण अंधेरी सब वेचे भौगोलिक कोडे अद्याप पालिकेला सोडवता आलेले नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही अंधेरी सब वे वारंवार वाहतुकीसाठी बंद करावा लागत आहे. त्यामुळे आधीच या भुयारी मार्गावरून मुंबई महापालिकेवर टीका होत असते. त्यातच आता यावरून खिल्लीही उडवली जात आहे. विवाह जमवणाऱ्या एका कंपनीची एक जाहिरात समाजमाध्यमांवर फिरत असून त्यात ‘डुबना हैं तो प्यार में डूबो…, यहा नही…’ असे नमुद करण्यात आले आहे.
दरम्यान, अशी कोणतीही जाहिरात प्रत्यक्षात घटनास्थळी म्हणजेच अंधेरी सब वे येथे लावलेली नाही. त्यामुळे हे कृत्रिम प्रज्ञेच्या माध्यमातून केलेले असण्याची शक्यता अंधेरी लोखंडवाला रहिवासी संघटनेचे धवल शाह यांनी व्यक्त केली आहे. तसेच ही जाहिरात त्या संबंधित कंपनीची आहे का याबाबतही कोणतीही माहिती नाही. मात्र या जाहिरातीचा वापर करून अंधेरी सब वेचा विषय मात्र चर्चेत आला आहे.
यंदा किमान १० वेळा सब वे बंद
अंधेरी सब वेमध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा करणारी उपाययोजना केली जात नाही तोपर्यंत थोडासा पाऊस पडला तरी सब वे वाहतुकीसाठी बंद करणे हाच एक मार्ग आहे. अंधेरी सब वे २०२४ च्या पावसाळ्यात तब्बल २८ वेळा वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागला होता. पंधरा मिनिटे ते चार तास वाहतूक बंद ठेवावी लागली होती. तर २०२३ मध्ये हा भूमिगत मार्ग संपूर्ण पावसाळ्यात २१ वेळा बंद ठेवावा लागला होता. यंदा पावसाळ्यात आतापर्यंत किमान १० वेळा हा सब वे बंद करावा लागला आहे.