मुंबई: मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनच्या (एमएमआरसी) आणिक आगार ते गेटवे आॅफ इंडिया भुयारी मेट्रो ११ मार्गिकेला राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे. यासंबंधीचा शासन निर्णय ११ सप्टेंबरला प्रसिद्ध करण्यात आला असून मार्च २०२६ पासून या मार्गिकेच्या बांधकामास सुरुवात करण्याचे नियोजन आहे. तर काम सुरु झाल्यापासून साडे पाच वर्षात अर्थात सप्टेंबर २०३१ पर्यंत काम पूर्ण करून या मार्गिकेचे संचलन करण्याचे उद्दिष्ट आहे. आणिक आगार ते गेटवे प्रवासासाठी ६० रुपये मोजावे लागणार आहेत.

राज्य सरकारने या मार्गिकेच्या तिकीट दरासही मान्यता दिली आहे. या मार्गिकेसाठी १० रुपये ते ६० रुपये असे तिकीट दर निश्चित करण्यात आले असून भाडे निर्धारण समितीला सरकारच्या पूर्व परवानगीने तिकीट दरात सुधारणा, बदल करता येणार आहेत.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) १४ मेट्रो मार्गिकांच्या प्रकल्पातील भुयारी मेट्रो ११ मार्गिकेच्या उभारणीसह संचलनाची जबाबदारी सरकारने एमएमआरसीला दिली आहे. ही मार्गिका एमएमआरसीकडे आल्यानंतर एमएमआरसीने संरेखन,आराखडा,पर्यावरण-सामाजिक प्रभाव मूल्यांकन अभ्यास पूर्ण करत आता या मार्गिकेस,मार्गिकेच्या खर्चास मान्यता घेतली आहे. राज्य सरकारच्या मान्यतेनंतर आता एमएमआरसीला केंद्र सरकारच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे. केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर एमएमआरसीकडून निविदा प्रक्रिया राबवून निविदा अंतिम करत कामास सुरुवात केली जाणार आहे. दरम्यान सरकारच्या ११ सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार १७.५१ किमीच्या आणि २३ हजार ४८७ कोटी रुपये खर्चाच्या या मार्गिकेच्या कामाला मार्च २०२६ मध्ये सुरुवात करण्याचे नियोजन आहे. काम सुरु झाल्यापासून साडेपाच वर्षात अर्थात सप्टेंबर २०३१ भुयारी मेट्रो मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याचे सरकारचे नियोजन आहे. १४ मेट्रो स्थानकांचा समावेश असलेल्या या मेट्रो मार्गिकेवर सहा डब्ब्यांची मेट्रो धावणार असून या एका वेळी मेट्रो गाडीतून १८०० ते २२८० प्रवासी प्रवास करु शकतील.

दिवसाला साडेपाच लाख प्रवासी

मेट्रो ११ मार्गिका २०३१ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाल्यास या मार्गिकेवरुन पहिल्या वर्षी दिवसाला पाच लाख ८० हजार प्रवासी प्रवास करतील, असा दावा करण्यात आला आहे. तर २०५५ मध्ये या मार्गिकेची दैनंदिन प्रवासी संख्या १० लाखांपेक्षा अधिक असेल असाही दावा एमएमआरसीचा आहे. दरम्यान २०३१ मध्ये ही मार्गिका सेवेत दाखल झाल्यास आणिक आगार ते गेटवे असा प्रवास करण्यासाठी ६० रुपये आकारले जाणार आहेत. सरकारने या मार्गिकेच्या तिकीट दरासह मान्यता दिली आहे. त्यानुसार पहिल्या ३ किमीपर्यंतच्या प्रवासासाठी १० रुपये, २ ते ५ किमीच्या प्रवासासाठी २० रुपये ५ ते ८ किमीच्या प्रवासासाठी ३० रुपये, ८ ते १२ किमीच्या प्रवासासाठी ४० रुपये, १२ ते १५ किमीच्या प्रवासासाठी ५० रुपये आणि १५ ते १८ किमीच्या प्रवासासाठी ६० रुपये असे दर निश्चित करण्यात आले आहेत. या दरांमध्ये बदल, सुधारणा करण्याचे अधिकार भाडे निर्धारण समितीला असतील. मात्र सरकारच्या पूर्व परवानगीनेच दरात कोणतेही बदल करता येतील.