मुंबई : खरेदी केलेल्या सदनिकेचे शेअर सर्टिफिकेट नावावर करून देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोसायटीच्या प्राधिकृत अधिकाऱ्याला अटक केली. आरोपी अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अधिकाऱ्याने तक्रारदाराकडे एक लाख १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आल आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांनी एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये सदनिका खरेदी केली होती. त्या सोसायटीची कार्यकारी समिती बरखास्त करण्यात आली आहे. त्यामुळे सहकार विभागाने दयानंद चव्हाण यांची त्या सोसायटीच्या सहकार विभागाच्या पॅनलवरील प्राधिकृत अधिकारी तथा प्रमाणित लेखापरीक्षक म्हणून नेमणूक केली होती. तक्रारदारांनी सोसायटी शेअर सर्टिफिकेट मिळण्याकरीता चव्हाण यांच्याकडे अर्ज केला होता. त्यावेळी त्यांनी शेअर सर्टिफिकेट त्यांच्या नावे करण्यासाठी एक लाख १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. पण तक्रारदारांना लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. याप्रकरणी १० जुलैला तक्रार करण्यात आली होती.

संबंधित तक्रार प्राप्त झाल्यानंतर १५ जुलैला याबाबत पडताळणी करण्यात आली. त्यावेळी चव्हाण यांनी तक्रारदारांकडे कामा करता एक लाख १० हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याचे मान्य केले. त्याप्रकरणी एसीबीने बुधवारी सापळा रचून चव्हाण यांना तक्रारदाराकडून ५० हजार स्वीकारताना अटक केली. याप्रकरणी त्यांच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.