मुंबई : ॲप आधारित रिक्षा, टॅक्सी चालकांचा संप उद्याही सुरूच राहणार आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि रायगडमधील हजारो प्रवाशांना फटका बसणार आहे. ओला आणि उबरसह अनेक ॲपवर १५ जुलैपासून खूप कमी टॅक्सी-रिक्षा उपलब्ध असल्याने स्थानिक वाहतूक सेवेवर प्रचंड ताण पडला आहे. त्यामुळे बस, रिक्षासाठी प्रवाशांच्या रांगा लागत आहेत. तर, प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) चालकांच्या मागण्याबाबत मंगळवारपर्यंत निर्णय घेण्याचे ठरवले आहे.
ॲप आधारित टॅक्सी-रिक्षा सेवा अपुरी असल्याने, ऑटोरिक्षा चालक, काळ्या-पिवळ्या टॅक्सी चालक या परिस्थितीचा फायदा घेत आहेत. अनेकांनी मीटरने रिक्षा, टॅक्सी चालवण्यास नकार दिला आणि अव्वाच्या सव्वा भाडे आकारले. ज्या अंतरासाठी १०० ते १५० रुपये लागतात, त्या प्रवासासाठी २०० ते ४०० रुपये भाडे आकारण्यात आले. तर, काही रिक्षा, टॅक्सी चालकांनी एका किमी मागे ५० ते १०० रुपये वसूल केले.
महाराष्ट्र कामगार सभेचे काय म्हणणे…
राज्यातील ॲप-आधारित कॅब चालकांचा संप सुरूच राहणार आहे. परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर शुक्रवारी बैठक झाली असून, त्यात काहीही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. चालकांच्या मागण्यांबाबत विचार करण्यासाठी मंगळवारपर्यंतचा वेळ मागितला आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नाही, असे महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी सांगितले. दरम्यान क्षीरसागर यांनी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी शुक्रवारपासून अनिश्चित काळासाठी उपोषण सुरू केले आहे.
आत्महत्या केलेल्या चालकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत नालासोपारा येथील ॲप आधारित टॅक्सी चालक सनोज सक्सेना याच्या कुटुंबाला एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे. आर्थिक अडचणीमुळे सक्सेना यांनी आत्महत्या केली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला मदत म्हणून हा धनादेश देण्यात आला. तसेच राज्य सरकारने सक्सेनाच्या कुटुंबियांना केवळ आर्थिक मदत न करता, त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक खर्च उचलावा, अशी मागणी क्षीरसागर यांनी केली.
ॲप आधारित कॅब चालकांच्या मागण्या, समस्या शुक्रवारी ऐकून घेतल्या. भाडेदरविषयीची त्यांची मुख्य मागणी आहे. त्यांच्या सर्व मागण्यांबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करून मंगळवारपर्यंत निर्णय घेण्यात येईल, असे प्रभारी अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांनी सांगितले.
उबर आरक्षित करताना शुक्रवारी नेहमीपेक्षा दुप्पटीहून अधिक भाडे दाखविण्यात आले. सकाळी १० वाजता डोंबिवली – तुर्भे दरम्यानच्या प्रवासासाठी १,७५० रुपये भाडे दाखविण्यात आले. दरवेळी ६५० ते ८०० रूपयांपर्यंत भाडे आकारण्यात येते, असे डोंबिवली येथील सचिन पाटील यांनी सांगितले.
मी ॲप आधारित टॅक्सीने वारंवार प्रवास करतो. परंतु, संप काळात माझे संपूर्ण वेळापत्रक बिघडले आहे. फोर्ट परिसरातील कार्यालयात जाण्यास प्रचंड विलंब होतो, असे विक्रोळी येथील रत्नेश चुबळे यांनी सांगितले.