मुंबई: कोसळलेल्या वा अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतीतील जे मूळ भाडेकरु वर्षानुवर्षे संक्रमण शिबिरात राहत आहेत, त्यांना कायमस्वरूपी हक्काचे घर देण्याच्यादृष्टीने म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून अर्जस्वीकृतीस सुरुवात करण्यात आली आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्जस्वीकृतीला गेल्या आठवड्यात सुरुवात झाली असून संक्रमण शिबिरार्थींना २० मे पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.
बृहतसूचीची प्रक्रिया संगणकीय
दक्षिण मुंबईतील कोसळलेल्या वा अतिधोकादायक घोषित झालेल्या इमारतीतील मूळ भाडेकरुंना दुरुस्ती मंडळाकडून मुंबईतील विविध ठिकाणच्या संक्रमण शिबिरात तात्पुरते स्थलांतरीत केले जाते. तर त्यांच्या इमारतींचा पुनर्विकास पूर्ण झाल्यास त्यांना पुनर्वसित इमारतीतील हक्काच्या घराचा ताबा दिला जातो. मात्र अशावेळी अनेक मूळ भाडेकरु असे असतात की ज्यांच्या इमारतींचा पुनर्विकास होतच नाही. त्यामुळे अशा भाडेकरुंना संक्रमण शिबिरातच रहावे लागते. अगदी ३५ ते ४० वर्षे संक्रमण शिबिरात राहणारे मूळ भाडेकरु आजही दिसून येतात. अशावेळी अशा भाडेकरुंचेही हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी दुरुस्ती मंडळाकडून अशा भाडेकरुंची मास्टरलिस्ट अर्थात बृहतसूची तयार केली जाते.
या बृहतसूचीवर पात्र ठरलेल्या मूळ भाडेकरुला वा त्याच्या पात्र वारसदारास मंडळाकडून घराचे वितरण करण्यात येते. उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाद्वारे दुरुस्ती मंडळाला खासगी विकासकांकडून जे अतिरिक्त घरे उपलब्ध होतात, ती घरे या भाडेकरुंना सोडत पद्धतीने वितरीत करत त्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण केले जाते. त्यानुसार मागील कित्येक वर्षांपासून अशाप्रकारे बृहतसूचीवरील घरांचे वितरण सुरु आहे. दरम्यान या सोडतीत पारदर्शकता नसल्याचा आणि भ्रष्टाचारा आरोप होत असल्याने आता ही संपूर्ण प्रक्रिया संगणकीय करण्यात आली आहे. त्यानुसार संगणकीय पद्धतीने अर्जस्वीकृतीची प्रक्रिया नुकतीच दुरुस्ती मंडळाकडून करण्यात आली आहे.
दर चार महिन्यांनी अर्जस्वीकृती
निमाप्रमाणे दर चार महिन्याने मंडळाकडून बृहतसूचीसाठी अर्ज मागविले जातात. त्यानुसार जानेवारीत अर्ज मागविण्यात आले होते. यावेळी २०९० अर्ज सादर झाले होते. यापैकी २३८ अर्जदारांचा अहवाल कार्यकारी अभियंत्यांकडून सादर झाल होता. यातील १०० अर्जदार पात्र ठरले होते. पात्र अर्जदारांसाठी नुकतीच २४ एप्रिलला सोडत काढण्यात आली आहे. दुसरीकडे आता नव्याने अर्ज मागविण्यास मंडळाने सुरुवात केली आहे. त्यानुसार masterlist.mhada.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया संबंधित संक्रमण शिबिरार्थींना पार पाडता येणार आहे. २० मे ला रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहे. अर्ज सादर झाल्यानंतर त्यांची पात्रता निश्चिती करत पात्र अर्जदारांसाठी सोडत काढत त्यांना हक्काच्या घराचे वितरण केले जाणार आहे.