मुंबई : किमान वेतन, वेळेवर वेतन मिळावे, प्रसूती रजा, भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती वेतन आदी मागण्यांसाठी गुरूवारी मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेल्या दीड हजार आशा सेविकांनी कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी उप कामगार आयुक्तांनी आशा सेविकांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. यावेळी त्यांच्या मागण्यांसदर्भात ९ जुलै रोजी अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.

विविध मागण्यांसाठी १६ जूनपासून मुंबई महानगरपालिकेअंतर्गक कार्यरत असलेल्या आशा सेविकांनी महापालिका आरोग्य सेवा संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रकाश देवदास यांच्या मार्गदर्शनाखाली काम बंद आंदोलन पुकारले आहे. मात्र त्यांच्या मागण्यांकडे मुंबई महानगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने जवळपास दीड हजार आशा सेविकांनी कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी उप कामगार आयुक्तांनी आशा सेविकांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करून त्यांच्या मागण्या समजावून घेतल्या. तसेच यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांसोबत चर्चा करून ९ जुलै रोजी अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र अंतिम निर्णय होईपर्यंत आझाद मैदानात आंदोलन सुरू करण्यात आल्याची माहिती ॲड. प्रकाश देवदास यांनी दिली. मुंबई महानगरपालिकेअंतर्गत काम करणाऱ्या आशा सेविकांना महिन्याला तीन हजार रुपये वेतन दिले जाते. नियमानुसार त्यांना महिन्याला २१ हजार रुपये किमान वेतन मिळणे आवश्यक असल्याचेही देवदास यांनी सांगितले.