मुंबई : मराठी रंगभूमीला संगीत नाटकांची वैभवशाली परंपरा लाभली आहे. बालगंधर्व, मास्टर दीनानाथ मंगेशकर, केशवराव भोसले आदी दिग्गज मंडळींनी संगीत नाटकांचा सुवर्णकाळ दाखवला. मात्र सध्या संगीत नाटकांचा ओघ कमी पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर प्रभादेवी येथील महाराष्ट्र शासनाच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र अकादमी संकुलातील रवींद्र नाट्य मंदिर मराठी संगीत नाटकांसाठी २५ टक्के सवलतीत उपलब्ध होणार आहे, अशी घोषणा महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. विशेष बाब म्हणजे ही सवलत मराठी बालनाट्यांसाठीही लागू असणार आहे.

मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक व अभिनेते दिवंगत अरविंद पिळगावकर यांच्या आठवणींचा संग्रह असलेल्या तपस्या नेवे यांनी संपादित केलेल्या ‘कोहम् सोहम्’ या पुस्तकाचे प्रकाशन रवींद्र नाट्य मंदिरच्या लघु नाट्यगृहात ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधत असताना संगीत नाटकांसाठी रवींद्र नाट्य मंदिर हे २५ टक्के सवलतीत उपलब्ध करून देणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा त्यांनी केली. ‘कोहम् सोहम्’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे, गायक अजित कडकडे, दिनेश पिळगावकर, रामदास भटकळ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

‘अरविंद पिळगावकर यांच्या जीवन प्रवासावर आधारित असलेले ‘कोहम् सोहम्’ हे पुस्तक संगीत रंगभूमीचा, शास्त्रीय संगीत आणि उपशास्त्रीय संगीत परंपरेचा एक मोठा इतिहास उलगडणार आहे. तसेच हे पुस्तक मुंबईच्या सांस्कृतिक घडामोडींच्या नोंदी ठेवणारे असून युवा पिढीने वाचावे असा संदर्भ कोश आहे’, असे मत ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त करीत संगीत नाटकांसाठी एक योजनाही जाहीर केली.

नेमकी सवलत कशी असणार ?

मराठी रंगभूमीला संगीत नाटकांची प्रतिष्ठित परंपरा लाभली आहे. ही परंपरा पुढे नेण्यासाठी विद्यार्थीदशेतील युवा रंगकर्मी संगीत एकांकिका करण्यावर भर देत असतात. तर अनेकजण संगीत नाटकांची निर्मिती करून प्रेक्षकांमध्ये संगीत नाटकांबद्दल आवड निर्माण करण्याचे सातत्याने प्रयत्न करीत असतात. आता संगीत नाटकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने रवींद्र नाट्य मंदिर सवलतीत देण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयाच्या अनुषंगाने वर्षभर शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी रवींद्र नाट्य मंदिरच्या मुख्य नाट्यगृहाची एकूण २४ सत्रे, लघु नाट्यगृहाची एकूण १२ सत्रे सकाळी ९.३० ते दुपारी २ या कालावधीत २५ टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे ही सवलत मराठी बालनाट्यांसाठीही लागू होणार आहे. तर नेहमीप्रमाणे दुपारनंतरची सत्रे व्यावसायिक नाटकांसाठी उपलब्ध असणार आहेत. दरम्यान, एका बालनाट्य व संगीत नाटकाला वर्षभरात उपलब्धतेनुसार जास्तीत जास्त दोन वेळा २५ टक्के सवलतीचा लाभ घेता येणार आहे.