मुंबई– मुंबई फिरण्यासाठी आलेल्या तीन तरूणांना मद्यपान करून समुद्रकिनाऱ्यावर गाडी चालवणे चांगलेच महागात पडले आहे. त्यांनी गाडी थेट समुद्राच्या पाण्यात घातल्याने ती वाळूत रुतून बसली. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने दोन तासांच्या प्रयत्नाने ही गाडी बाहेर काढली. या तिन्ही तरुणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून गाडी जप्त केली आहे.
तरूण यादव (३६) हा खार येथे राहतो. त्याला दोन मित्र भेटण्यासाठी मुंबईत आले होते. नजीब सय्यद (४२) हा आंध्रप्रदेशातून तर ब्रिजेश सोनी (३३) हा मध्य प्रदेशातून आला होता. मुंबईत फिरल्यानंतर त्यांनी शुक्रवारी रात्री भरपूर मद्यपान केले. याच मद्याच्या नशेत त्यांनी गाडी जुहूच्या समुद्रकिनाऱ्यावर नेली. रात्री ८ च्या सुमारास ते गाडीने समुद्र किनाऱ्यावर फिरत होते. मात्र मद्याच्या नशेत असल्याने त्यांनी गाडी थेट समुद्रातच नेली. मात्र तेथील वाळूत त्यांचे वाहन अडकले. हा प्रकार गस्तीवरील पोलिसांनी पाहिला. अग्निशमन दलाच्या मदतीने ट्रॅक्टर आणून त्यांचे समुद्रात अडकलेले वाहन काढण्यात आले. त्यासाठी पोलिसांना दोन तास लागले. त्यानंतर तिघांना पोलीस ठाण्यात नेऊन समज देण्यात आली.
या तरुणांनी मद्यप्राशन केल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना सध्या नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. मात्र त्यांची गाडी जप्त करण्यात आली असून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.