मुंबई : माउंट मेरी जत्रा रविवारपासून सुरवात झाली. जत्रेच्या पहिल्याच दिवशी चोरी आणि पाकिटमारी करणाऱ्या १२ चोरांना वांद्रे पोलिसांच्या विशेष पथकाने रंगेहाथ अटक केली. या जत्रेच्या वेळी होणाऱ्या गर्दीच्या फायदा घेऊन चोर सक्रिय होतात. त्यामुळे पोलिसांनी खास पथक तयार केले आहे.
मदर मेरीच्या जन्मोत्सवानिमित्त दरवर्षी मुंबईच्या वांद्रे येथे माऊंट मेरीची जत्रा आयोजित करण्यात येते. ही जत्रा दरवर्षी सप्टेंबरच्या दुसऱ्या रविवारी सुरू होते आणि एक आठवडा चालते. या जत्रेदरम्यान मुंबई तसेच महाराष्ट्रातील आणि देश-विदेशातील लाखो भाविक वांद्र्यात येतात. या काळात माऊंट मेरी बॅसिलिका आणि आसपासचा परिसर रोषणाई, मेणबत्त्या, फुले आणि भक्तगणांनी गजबजलेला असतो. रविवार १४ सप्टेंबरपासून या यात्रेला सुरवात झाली. या गर्दीचा गैरफायदा घेऊन काही समाजकंटक व सराईत चोर पाकिटमारी आणि मोबाइल चोरी करतात. यामुळे भुरट्या चोरांना रोखण्यासाठी परिमंडळ- ९ मधून विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकाला जत्रा परिसरावर सतत लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली होती.
पहिल्यात दिवशी १२ जणांना अटक
माऊंट मेरी जत्रेचा रविवारी पहिला दिवस होता. पोलिसांचे पथक साध्या कपड्यात गर्दीत मिसळून लक्ष ठेवत होते. यावेळी गर्दीत चोरी कऱणाऱ्या १२ जणांना रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यात ९ पुरूष आणि ३ महिला आरोपींचा समावेश आहे. या आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) विविध कलमान्वये ९ वेगवेगळे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
जत्रा आठवडाभर चालणार असून हे विशेष पथक आठवडाभर या परिसरात अशाच प्रकारे कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी साेंगितले. या जत्रेत प्रचंड गर्दी असते. त्यामुळे गर्दीचा फायदा घेत फेस्टिवल चोर सक्रिय होतात. यासाठी ते देशाच्या विविध भागातून मुंबईत येतात, असेही पोलिसांनी सांगितले.
या पथकाने केली कारवाई
पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी अतिरिक्त पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक) परमजित सिंह दाहिया, पोलीस उपायुक्त दिक्षित गेडाम (परिमडंळ-९) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त (वांद्रे) विभाग यांच्या विशेष पथकातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली.