राज्याच्या सत्तेत जास्तीत जास्त वाटा मिळवायचा असेल, तर रिपब्लिकन पक्षाच्या वेगवेगळ्या गटांना एकत्र करण्याची आवश्यकता असून त्यासाठी भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशीही चर्चा करण्याची आपली तयारी आहे, अशी ग्वाही रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिले.
राज्यातील आंबेडकरी समाज वेगवेगळ्या रिपब्लिकन गटांत विभागला आहे. त्यातल्या त्यात आपला गट प्रभावी असला तरी, निवडणुकीतजिंकण्यासाठी एकटय़ाची ताकद पुरी पडत नाही. राजकीयदृष्टय़ा समाजाला एकत्र करायचे असेल तर रिपब्लिकन गटांचे ऐक्य करावे लागेल, असे आठवले ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले.
 राज्याच्या सत्तेत जास्तीत जास्त वाटा मिळवायचा असेल, तर रिपब्लिकन नेत्यांनी एकत्र आले पाहिजे. १९९० च्या ऐक्याच्या प्रयत्नापासून आपली हीच भूमिका आहे. सर्वानी एकत्र यावे आणि कुठल्याही पक्षाशी युती करावी, असे आपले मत आहे. २००९ मध्ये आपण ऐक्याचा प्रयोग केला. त्या वेळी आंबेडकर सोडून बाकीचे सारे गट आले; परंतु निवडणुकीत त्याचा काही प्रभाव पडू शकला नाही. त्यामुळेच आपणास शिवसेना-भाजपबरोबर युती करण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे त्यांनी सांगितले.
रिपब्लिकन ऐक्याची आता पूर्णपणे आशा संपली आहे का, असे विचारले असता, राजकारणात आपापल्या वाटा वेगळ्या असल्या तरी किमान सामाजिक प्रश्नावर तरी केवळ राज्य पातळीवरच नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवर मायावती, प्रकाश आंबेडकर, रामविलास पासवान आदी नेत्यांनी एकत्र यावे, अशी आपली भूमिका आहे, असे आठवले म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Athavale ready for unity of republican groups