भारतीय बॅंकांना ठकवून फरारी झालेल्या विजय मल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या घोटाळ्यातील १५ हजार कोटींची मालमत्ता पुन्हा बॅंकांकडे जमा करण्यात सक्तवसुली संचालनालयाला यश आले आहे. याशिवाय यापैकी काही मालमत्तांचा लिलाव करून ८ हजार कोटी स्टेट बॅंकेकडे जमा झाले आहेत. घोटाळ्यातील अधिकाधिक रक्कम लिलावातून संबंधित बॅंकांना परत मिळण्याची शक्यता संचालनालयाने वर्तविली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- फराळाच्या परदेशवारीत वाढ; साखर विरहित, कमी स्निग्धांश फराळासाठी वाढती मागणी

फरारी मल्या, मोदी, चोक्सीला पुन्हा भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत नसल्याची टीका विरोधकांकडून होत असताना, संचालनालयाने या तिघांच्या एकूण २२ हजार ५८५ कोटी घोटाळ्यांतील १९ हजार १११ कोटी म्हणजे ८४ टक्के मालमत्ता जप्त करण्यात यश मिळाल्याचे दिसून येत आहे. या मालमत्तेपैकी १५ हजार ११३ कोटी रुपयांची मालमत्ता गुन्ह्यांचा भाग असल्याचे स्पष्ट होत आहे. संबंधित अभिनिर्णय अधिकाऱ्यांनी तसे शिक्कामोर्तब केल्यामुळे ती मालमत्ता संबंधित बॅंकांना परतही करण्यात आली आहे. याचा अर्थ एकूण घोटाळ्यापैकी ६६ टक्के मालमत्ता बॅंकांकडे जमा झाली आहे. या तिघांच्या घोटाळ्यातील साडेतीन हजार कोटींच्या मालमत्तेचा शोध लावण्यात संचालनालयाला यश आलेले नाही. ही रक्कमही खूप मोठी आहे.

हेही वाचा- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा!

बॅंकांना गंडा घालून हे तिघे पसार झाले आहेत. त्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर त्यांच्यावर रीतसर खटले चालविले जातील, असे संचालनालयातील सूत्रांनी सांगितले. त्यांच्या आणखी काही मालमत्तांचा शोध सुरू असल्याचेही सांगण्यात आले. या तिघांच्या नावे परदेशात बनावट कंपन्यांद्वारे मोठी रक्कम वळविण्यात आली होती. तीही हस्तगत करण्यात यश आल्याचे संचालनालयाचे म्हणणे आहे.
नेहमीच विरोधकांविरुद्ध कारवाई करीत असल्याचा आरोप असलेल्या संचालनालयामार्फत गुन्ह्यातील अधिकाधिक रक्कम सरकारदरबारी जमा करून ती नंतंर संबंधितांना सुपूर्द करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा- अखेर राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

३१ मार्च २०२२ पर्यंत सक्तवसुली संचालनालयाने काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये पाच हजार ४२२ गुन्हे दाखल झाले आहेत. मालमत्ता जप्तीचे एक हजार ७३९ आदेश जारी करून सुमारे एक लाख चार हजार ७०२ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यापैकी ५८ हजार ५९१ कोटींची मालमत्ता ही गुन्ह्याचा भाग असल्याबाबत अभिनिर्णय न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. आतापर्यंत या गुन्ह्यांत ४०८ जणांना अटक करण्यात आली आहे. ९९२ प्रकरणात आरोपपत्र दाखल झाले असून आतापर्यंत या गुन्ह्याखाली फक्त २५ जणांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Auction of properties of nirav modi vijay mallya and choksi by ed 15 thousand crores of assets again deposited in the bank mumbai print news dpj