मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांच्या अपघाताची मालिका सुरूच असून मंगळवारी फोर्ट परिसरातून जात असलेल्या बसला अचानक आग लागली. या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. परंतु, बसचे प्रचंड नुकसान झाले.

बेस्टची बस मार्ग क्रमांक ए-१३८ मंगळवारी सकाळी आगारातून बस निघाली. बस भाटिया बाग परिसरातून बॅकबे आगाराकडे जात होती. सिद्धार्थ महाविद्यालयानजिकच्या सिग्नल जवळ सकाळी ९.१५ च्या सुमारास बस पोहचली आणि अचानक बसला आग लागली.

बसच्या समोरील डाव्या बाजूला असलेल्या चाकाच्या शेजारच्या हाय व्होल्टेज बॅटरीजवळ आग लागली. वाहकाने त्वरित अग्निशमन दल आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ही बस भाडेतत्त्वावरील होती. ही स्विच दुमजली बस असून ती कुलाबा आगारातील होती. या घटनेची चौकशी सुरू असल्याचे बेस्ट उपक्रमातर्फे सांगण्यात आले.