मुंबई : शिवडी परिसरात शालेय विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेली बसची सेवा यंदा बेस्टने बंद केली आहे. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने बस सेवेसाठी दोन वर्षांचा निधीच न दिल्यामुळे बेस्टने ही सेवा बंद केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत तक्रार करण्यात आल्यानंतर शिक्षण विभागाला जाग आली आहे.
शिवडीमधील शालेय विद्यार्थ्यांसाठी गेल्या सात वर्षांपासून सुरू करण्यात आलेली बसची सेवा यंदा बेस्टने अचानक बंद केली. त्यामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांना त्रास सोसावा लागत आहे. शिवडी पूर्व येथील शिवडी कोळीवाडा शाळा, काळाचौकी येथील अभ्युदय नगर म्युनिसिपल शाळा, शिवडी पश्चिम येथील प्रबोधनकार ठाकरे म्युनिसिपल शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गेल्या सात वर्षांपासून ही सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र ही सेवा बंद पडल्यामुळे शिवडी परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बसची वाट बघावी लागते. लवकरात लवकर ही बिले बेस्ट प्रशासनाला अदा करून तत्काळ बस सेवा चालू करावी, अशी मागणी माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी शिक्षण विभागाला पत्र पाठवून केली आहे.
निधी न दिल्यामुळे बस बंद …
सात वर्षांपूर्वी ही बससेवा सुरू करण्यात आली होती. मात्र बेस्ट प्रशासनाला शिक्षण विभागाने दोन वर्षांचा बेस्टच्या खर्चाचा निधीच दिला नाही. त्यामुळे यंदा १६ जूनला शाळा सुरू झाल्या तरी ही बस महिनाभरात सुरू होऊ शकलेली नाही. ही बससेवा पूर्ववत सुरू न झाल्यास विद्यार्थी व पालकांना घेऊन शिवसेनेच्या स्थानिक वरिष्ठ लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी दिला.
पुढील आठवड्यात पाच बस सुरू करणार
याबाबत शिक्षण विभागातील अधिकारी निसार खान यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, काही तांत्रिक कारणामुळे हा निधी देण्याचे राहून गेले. मात्र लवकरच निधी दिला जाईल. बेस्ट उपक्रम हा महापालिकेचाच भाग आहे. त्यामुळे हा निधी लवकरात लवकर दिला जाईल. तसेच याबाबत बेस्टच्या अधिकाऱ्यांबरोबरही बैठक घेण्यात आली असून येत्या आठ दिवसांत बससेवा पूर्ववत सुरू करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या सोयीसीठी या मार्गावर पाच बसगाड्या सुरू करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.