मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्टच्या बसभाड्यात या आठवड्यापासून वाढ होण्याची शक्यता आहे. बेस्ट बस भाडेवाढीबाबतच्या प्रस्तावाला मुंबई महापालिका प्रशासनापाठोपाठच परिवहन प्राधिकरणाने मंजूरी दिली आहे. त्यामुळे ८ मे पासून भाडेवाढ लागू करण्याची तयारी बेस्ट प्रशासनाने केली आहे. मात्र परिवहन प्राधिकरणाकडून अद्याप लेखी प्रत मिळालेली नाही. त्यामुळे ती प्रत मिळाल्यानंतर या आठवड्यात ही भाडेवाढ लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना लवकरच बेस्ट बसच्या प्रवासासाठी दुप्पट भाडे द्यावे लागणार आहे.

बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांचे सध्याचे भाडे अतिशय कमी आहे. त्यामुळे प्रवाशांची, मुंबईकरांची या बेस्ट बसला पसंती असते. मात्र या बसभाड्यात दुप्पट वाढ होणार आहे. बेस्ट उपक्रमाने बसभाडेवाढीबाबत पाठवलेल्या प्रस्तावाला मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मंजूरी दिली होती. त्यानंतर हा प्रस्ताव मंजूरीसाठी राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला होता. राज्य परिवहन प्राधिकरणाची एक बैठक गेल्याच आठवड्यात पार पडली असून त्यात भाडेवाढीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर आता बेस्ट प्रशासनाने भाडेवाढीची तयारी सुरू केली आहे.

बेस्टचे भाडे दुपटीने वाढणार ?

बेस्टने सुचवलेली भाडेवाढ परिवहन प्राधिकरणाने मंजूर केली आहे की त्यात काही बदल सुचवले आहेत हे पाहून बेस्टतर्फे सर्वसामान्यांसाठी तारीख जाहीर केली जाणार आहे. बेस्टने किमान भाडयात दुपटीने वाढ केली आहे. साधारण बसचे किमान भाडे पाच रुपये आहे ते १० रुपये प्रस्तावित केले आहे. तर वातानुकुलित बसचे किमान भाडे सहा रुपये आहे ते बारा रुपये प्रस्तावित करण्यात आले आहे.

८ मे पासून ?

परिवहन प्राधिकरणाच्या मंजूरीनंतर बेस्ट प्रशासनाने आपल्या संबंधित विभागांना एक परिपत्रक धाडले असून त्यात ८ मे पासून भाडेवाढ लागू करण्याबाबत म्हटले आहे. मात्र परिवहन प्राधिकरणाने मंजूरी दिलेली असली तरी त्याची लेखी प्रत अद्याप बेस्ट उपक्रमाला मिळालेली नाही. त्यामुळे ती प्रत मिळाल्यानंतरच खरी तारीख जाहीर केली जाणार असल्याची माहिती बेस्टमधील अधिकाऱ्यांनी दिली. प्राधिकरणाच्या मंजूरीनंतर तिकीटाच्या यंत्रणेत बदल करण्यासाठी बेस्टला दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे ही भाडेवाड ८ तारखेला होऊ शकली नाही तरी या आठवड्यात होऊ शकेल अशी माहिती बेस्टमधील सूत्रांनी दिली.

सात वर्षांनी भाडेवाढ बेस्ट उपक्रमाने २०१८ मध्ये भाडेवाढ केली होती. तेव्हा बेस्टचे किमान भाडे ८ रुपये होते. तर वातानुकूलित बसचे भाडे २० रुपये होते. त्यानंतर २०१९ मध्ये तत्कालीन पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी बेस्टच्या भाड्यात कपात केली होती. बेस्टचे साधारण बसचे भाडे पाच रुपये तर वातानुकूलित बसचे किमान भाडे सहा रुपये इतके कमी करण्यात आले होते. बेस्टच्या भाड्यात कपात झाल्यामुळे बेस्टचे प्रवासी वाढले पण बेस्टचा महसूल घसरला होता. तसेच बेस्टकडे पाच रुपयांची नाणी मोठ्या प्रमाणावर जमा झाली होती. २०१९ पासून बेस्टचे किमान भाडे पाच रुपयेच असून त्यात वाढ करावी अशी मागणी प्रशासनाकडून वारंवार होत होती. मात्र निवडणूकीच्या नावाखाली ही भाडेवाढ होऊ शकली नाही. बेस्टला मात्र भाडेकपातीमुळे प्रंचड तोटा सहन करावा लागला.