भारतीय क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त मुंबईत एका अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईतील परळ येथे आर. एम. भट हायस्कूलमध्ये सचिन तेंडुलकरचं ५० फूट x २४ फुटांचं भव्य पेंटिंग साकारण्यात येणार आहे. चित्रकार गौरव भाटकर आणि अभिषेक साटम यांनी हा पुढाकार घेतला आहे. याबाबत माहिती देताना गौरव भाटकर म्हणाले, “शतकवीराच्या सुवर्णमहोत्सवी जन्म सोहळ्याला अनोख्या शुभेच्छा देण्यासाठी रंगात दंग होण्यासाठी या. पण कुठे? तर आपल्या आर एम भट हायस्कूलमध्ये.”
गौरव भाटकर म्हणाले, “आयुष्यात कधीतरी आपल्या सीमा तोडायच्याच असतात. मी आजपर्यंत सगळ्यात मोठं पेंटिंग ८ फुटाचं बनवलं होतं. आज अभिषेक साटम या मित्रामुळे मी माझी सीमा तोडू शकलो आहे. आता ५०x२४ फुटांचं चित्र बनत आहे. का, कुणीसाठी? कारण सचिन तेंडुलकर सरांचा ५० वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने एक भलंमोठं पेंटिंग बनत आहे.”
“पहिल्यांदा सचिन तेंडुलकरांसाठी पेंटिंग बनवावं हा घाट घातला”
“अभिषेकने आजपर्यंत सचिन तेंडुलकरांचा वाढदिवस फार थाटात साजरा केला आहे. आजपर्यंत तो रांगोळी काढायचा. आज पहिल्यांदा त्याने सचिन तेंडुलकरांसाठी हे पेंटिंग बनवावं हा घाट घातला आहे. या पेंटिंगला तुमचीही साथ हवी आहे. जे सचिनप्रेमी आहेत, त्या प्रत्येकाने या, तुमच्या हाताचे ठसे या चित्राला लावा आणि हे चित्र पूर्ण करा. मित्रांनो या रे या सारे या,” असं आवाहन गौरव भाटकर यांनी केलं.
हेही वाचा : “अर्जुनला ‘या’ प्रसंगाची आठवण करून देऊ नका”, सचिन तेंडुलकरने सांगितला पहिल्या विकेटचा किस्सा
“तुम्हाला यात सहभागी व्हायचं असेल तर…”
अभिषेक साटम आवाहन करत म्हणाले, “तुम्हाला यात सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही परळच्या आर. एम. भट हायस्कूलमध्ये या. इथं हे पेंटिंग साकारलं जात आहे. तर नक्की या.”
