मुंबई : अखेर मुंबई महानगरपालिकेने वांद्रे-कुर्ला संकुल करोना केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला असून येत्या महिन्याभरात येथील बांधकाम हटवून मोकळा झालेला भूखंड मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्यानंतर तात्काळ हा भूखंड बुलेट ट्रेन टर्मिनसच्या कामासाठी ‘द नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन’ला (एनएचएसआरसीएल) देण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईमध्ये मार्च २०२० पासून करोना संसर्ग वाढू लागला आणि आरोग्य सुविधा अपुरी पडू लागली. करोनाबाधित रुग्णांवर उपचार करता यावेत यासाठी राज्य सरकारच्या निर्देशानुसार ‘एमएमआरडीए’ने बीकेसीत जम्बो करोना केंद्र बांधले. मात्र या केंद्राचा काही भाग बुलेट ट्रेन टर्मिनससाठी ‘एनएचएसआरसीएल’ला देण्यात येणाऱ्या ४.२ हेक्टर भूखंडावर होत. त्यामुळे हा भूखंड ‘एनएचएसआरसीएल’ला देता येत नव्हता. परिणामी, बुलेट ट्रेन टर्मिनसचे काम रखडले होते. मात्र आता सत्तांतरानंतर बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग देण्यात आला आहे. बीकेसीमधील भूखंड ‘एनएचएसआरसीएल’ला देण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. मुळात नोव्हेंबर २०११ मध्येच हा भूखंड ‘एनएचएसआरसीएल’ला हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव प्राधिकरणाने मंजूर केला आहे. मात्र करोना केंद्रामुळे त्याचे हस्तांतरण रखडले होते.

नव्या सरकारने बुलेट ट्रेनची रखडलेली कामे मार्गी लावण्याचे आदेश दिल्यानंतर ‘एमएमआरडीए’ने करोना केंद्र बंद करून भूखंड रिकामा करण्याची सूचना केली होती. मात्र सप्टेंबरपर्यंत केंद्राची गरज असल्याचे मुंबई महानगरपालिकेने स्पष्ट केले होते. त्यामुळे सप्टेंबरनंतर हा भूखंड ‘एनएचएसआरसीएल’ला मिळेल अशी चर्चा होती. मात्र आता महिन्याभरात ही जागा ‘एमएमआरडीए’च्या आणि नंतर ‘एनएचएसआरसीएल’च्या ताब्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीकेसी बुलेट ट्रेन टर्मिनसचा मार्ग मोकळा होणार आहे. दरम्यान, बीकेसी बुलेट ट्रेन टर्मिनसच्या कामासाठी ‘एनएचएसआरसीएल’ने नुकत्याच फेरनिविदा मागविल्या आहेत.

बीकेसी करोना केंद्र बंद करण्याचे आदेश नुकतेच वरिष्ठांकडून आम्हाला मिळाले आहेत. त्यानुसार केंद्र बंद करून बांधकाम आणि अन्य साहित्य हलविण्यास सुरूवात केली आहे. महिन्याभरात ही जागा रिकामी करून आम्ही ‘एमएमआरडीए’ला हस्तांतरित करण्यात येईल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bkc bullet train terminus mmrda possession plot mumbai municipal corporation mumbai print news ysh