शैलजा तिवले लोकसत्ता
मुंबई : केंद्रीय आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार कोणतीही लक्षणे नसलेल्या आणि संशयित रुग्णांसाठी करोना दक्षता केंद्राची(सीसीसी) उभारणी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. शहरात सध्या २०० केंद्रांचे नियोजन केले असून प्रत्येक वॉर्डमध्ये हे केंद्र उपलब्ध असेल.
रुग्णांची वाढत्या संख्या आणि जोखमीच्या रुग्णांना वेळेत सुविधा प्राप्त होण्यासाठी तीन वेगवेगळ्या पातळ्यांवरील रुग्णालयांचे नियोजन करण्याची मार्गदर्शक तत्त्वे केंद्रीय आरोग्य विभागाने जाहीर केली. यानुसार, प्रकृती गंभीर असलेल्या आणि जोखमीच्या गटातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी राखीव रुग्णालये (डीसीएच), तर मध्यम प्रकृतीच्या रुग्णांसाठी राखीव आरोग्य के ंद्र (डीसीएचसी) असतील. कोणतीही लक्षणे नसलेल्या आणि संशयित रुग्णांना सीसीसीमध्ये दाखल करण्यात येणार आहे.
शहरात सध्या सरकारी आणि खासगी रुग्णालयात तीन हजारांहून अधिक रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. मुंबईत गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णांसाठी कस्तुरबा, सैफी, सेव्हन हिल्स, नायर, केईएम, नानावटी, के.जे. सौमय्या, जगजीवन राम नारायण रेल्वे रुग्णालय, सेंट जॉर्ज, पी.डी. हिंदुजा, ग्लोबल, हिरानंदानी ,फोर्टिस या रुग्णालयांची डीसीएचअंतर्गत निवड केली आहे. मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी डीसीएचसीअंतर्गत बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर, राजावाडी, कुर्ला भाभा, वांद्रे भाभा, कामगार रुग्णालय (कांदिवली), बीपीटी रुग्णालय (वडाळा), ब्रीच कॅण्डी, लीलावती, एनएच एसआरसीसी रुग्णालय (महालक्ष्मी), बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय (कांदिवली) ही रुग्णालये उपलब्ध आहेत.
शहरात दररोज १५०० हून अधिक चाचण्या होत असून सुमारे दोनशेहून अधिक नवीन रुग्णांचे निदान होत आहे. यातील ८० टक्कय़ांहून अधिक रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. या रुग्णांची संख्या अधिक असल्याने तातडीने उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांना उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत.
यासाठी तीन पातळ्यांवर रुग्णांचे नियोजन करण्यात येत असून प्रत्येक वॉर्डमध्ये मोठे सभागृह, मोकळ्या इमारती, हॉटेल, शाळा वसतिगृहांमध्ये सीसीसी उभारण्यात येतील. यात राहण्यासह जेवणाची सोय असेल. डॉक्टरांचे पथक नियुक्त केले जाईल. दोन वेळेस ते रुग्णांची भेट घेऊन कोणती लक्षणे आहेत का याची पाहणी करतील. आवश्यकता भासल्यास रुग्णांना डीसीएचसी किंवा डीसीएचमध्ये पाठविण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.