पावसाळा संपल्यावरही डेंग्यूचा प्रभाव कायम असल्याने आरोग्य विभागाकडून सुरू असलेल्या उपाययोजना अधिक प्रभावी करण्यासाठी महापौरांच्या दालनात आयुक्तांसोबत अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. केईएममधील वैद्यकीय अभ्यासक्रम शिकणाऱ्या मुलीचा डेंग्युमुळे मृत्यू झाल्यानंतर पालिका खडबडून जागी झाली आहे. डेंग्यू आजाराबाबत माहिती तसेच डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यासाठी टीव्हीसह सर्व माध्यमांतून जनजागृती करण्याबाबत महापौरांनी सूचना दिल्या.
गेल्या वर्षांपासून मुंबईत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. पालिकेच्या रुग्णालयात या पावसाळ्यात आतापर्यंत सुमारे १५० रुग्णांवर उपचार करण्यात आले. शहरातील खासगी रुग्णालयातील डेंग्यूच्या रुग्णांबाबतची माहिती पालिकेकडून देण्यात येत नाही. मात्र, शहरातील ७० टक्के लोक खासगी रुग्णालयात उपचार करून घेत असल्याने ही संख्या निश्चितच अधिक असण्याची शक्यता आहे.
मलेरिया- डेंग्यू पसरवणारे डास हे स्वच्छ पाण्यात अंडी घालतात. कुंडीखालच्या थाळी, फुलदाणी, फेंगशुईची रोपे, टेरेसवर अडगळीत पडलेली बेसिनची भांडी यात साठणाऱ्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते. मात्र याबाबत पुरेशी जागृती नाही. त्याचप्रमाणे डेंग्यू पसरल्याची तक्रार करणाऱ्या अनेक उच्चभ्रू इमारतींमध्ये पालिका कर्मचाऱ्यांना प्रवेश नाकारला जातो. याबाबत अधिक कडक धोरण अवलंबण्याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांना महापौर स्नेहल आंबेकर यांनी सूचना दिल्या. डेंग्यू आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून भित्तीपत्रके लावली जातात. मात्र हा मार्ग पुरेसा प्रभावी ठरत नसल्याने टीव्ही, रेडियो यांच्या माध्यमातून मुंबईकरांपर्यंत पोहोचण्याच्या सूचना या बैठकीत मांडण्यात आल्या.
संग्रहित लेख, दिनांक 28th Oct 2014 रोजी प्रकाशित
डेंग्यूवर जनजागृतीची मात्रा
पावसाळा संपल्यावरही डेंग्यूचा प्रभाव कायम असल्याने आरोग्य विभागाकडून सुरू असलेल्या उपाययोजना अधिक प्रभावी करण्यासाठी महापौरांच्या दालनात आयुक्तांसोबत अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.

First published on: 28-10-2014 at 03:34 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc launches awareness programme on dengue after doctor death