मुंबई : हवेचा दर्जा सुधारण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. यासाठी पालिकेने विविध उपाययोजना राबविल्या असून अद्ययावत यंत्रांच्या खरेदीवरही भर दिला आहे. मुंबईतील धुळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिकेने बॅटरीवर चालणारी धूळ शोषणारी यंत्रे (डस्ट सक्शन मशीन) खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. येत्या पाच ते सहा महिन्यात ही यंत्रे कार्यान्वित करण्याचा पालिकेचा मानस आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईत ठिकठिकाणी सुरू असलेली विकासकामे, रस्त्यांवरील धूळ आणि वाहनांमधून निघणारा धूर आदी विविध कारणांमुळे गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील हवेचा दर्जा ढासळत आहे. परिणामी, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. हवा प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने मुंबईत सुरू असणाऱ्या बांधकाम आणि विकासकांसाठी डिसेंबरमध्ये विविध मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यांनतर काही प्रमाणात हवेत सुधारणा झाल्याचेही समोर आले होते. मात्र, काही ठिकाणी हवेचा दर्जा खालावलेलाच दिसून येत आहे. हवा प्रदूषणाला कारणीभूत ठरणारी रस्त्यावरील धूळ नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेने आता धूळ शोषणारी यंत्रे (डस्ट सक्शन मशीन) खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

४० कोटींचा खर्च

हवा प्रदूषणासंदर्भातील विविध बाबींचा अभ्यास केल्यानंतर महापालिकेचा पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आता सुमारे धूळ शोषणारी १०० यंत्रे खरेदी करणार आहे. यासाठी ४० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

येत्या पाच ते सहा महिन्यात पालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांच्या हद्दीत ही यंत्रे कार्यान्वित करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.

संबंधित यंत्रे बॅटरीवर चालणारी असल्याने रस्ते तसेच बांधकामाच्या ठिकाणी उडणारी धूळ या यंत्राद्वारे जमा केली जाईल. त्यांनतर जमा झालेल्या धुळीची ड्रेबिज पुर्नप्रकिया प्रकल्पात विल्हेवाट लावण्यात येईल. संबंधित यंत्रे बॅटरीवर चालणारी असल्याने त्यांची देखभाल करणे फारसे खर्चिक ठरणार नाही. एकदा चार्जिंग केल्यानंतर किमान दोन ते तीन दिवस सुरू राहतील, एवढी त्यांची क्षमता आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, असे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc to purchase latest equipment to control dust problem zws