मुंबई : अंधेरी व कुर्लादरम्यान असलेल्या साकीनाका भागात मुंबई महापालिकेने मोठी कारवाई करून अनधिकृत बांधकामे हटवली. हॉटेल्स, विश्रामगृह (डॉर्मेटरी), औद्योगिक परिसरातील बांधकामे यांच्यावर ही निष्कासन कारवाई करण्यात आली. त्यात अंतर्गत भिंत, अनधिकृत मजले, अनधिकृत बांधकामांचा समावेश आहे.मुंबई महानगरपालिकेच्या एल विभाग कार्यालयाच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या विविध भागातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येत आहे. त्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एल विभागाच्या हद्दीतील सफेद पूल, साकीनाका येथील औद्योगिक परिसरात अनधिकृतपणे उभारलेले हॉटेलचे वाढीव बांधकाम, अंतर्गत भिंतीचे पाडकाम करण्यात आले. तसेच साकीनाका येथील ९० फूट मार्गावरील दोन विश्रामगृहांचे (डॉर्मेटरी) मजले, साकीनाका (असल्फा मेट्रो स्थानक) येथील १८ खोल्या असलेली इमारत, ४० खोल्या असलेली अनधिकृत हॉटेल इमारत आदींवर निष्कासन कारवाई करण्यात आली. परिमंडळ ५ चे उपआयुक्त देवीदास क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्त (एल विभाग) धनाजी हेर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी ३० कामगार, ३० पोलीस, कार्यकारी अभियंता, सहायक अभियंते, कनिष्ठ अभियंते सहभागी झाले होते. कारवाईसाठी आवश्यक पोकलेन, जेसीबी संयंत्रे आणि वाहनांचा वापर करण्यात आला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc took major action and removed unauthorized constructions in sakinaka area between andheri and kurla mumbai print news sud 02