मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ‘अंधेरी पश्चिम – मंडाले मेट्रो २ ब’ मार्गिकेवरील ३५५ खांबाखाली बाॅलीवूड थीम पार्क उभारण्याचे काम हाती घेतले होते. मात्र या प्रकल्पाची घोषणा झाल्यापासून या पार्कला स्थानिकांचा विरोध होता. या प्रकल्पामुळे जनतेच्या पैशांचा अपव्यय असल्याचा आरोप करीत स्थानिकांनी हा प्रकल्प रद्द करण्यासाठी जनआंदोलन उभारले. अखेर स्थानिकांच्या लढ्याला यश आले असून ३०० कोटी रुपयांचा बाॅलीवूड थीम पार्क प्रकल्प गुंडाळण्यात आला आहे.

‘मेट्रो २ ब’ मार्गिका एस. व्ही. रोडवरील वांद्रे पश्चिम, खार, जुहू या भागांतून जात असून या भागांत हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार, अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, लेखक, निर्माते राहतात. चित्रपटसृष्टी आणि वांद्रे पश्चिम हे नाते पाहता चित्रपटसृष्टीचा इतिहास एका वेगळ्या माध्यमातून मांडण्यासाठी स्थानिक आमदार व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशीष शेलार यांनी मेट्रो मार्गिकेच्या खांबाखाली बाॅलीवूड थीम पार्क बांधण्याची संकल्पना मांडली. ती संकल्पना ‘एमएमआरडीए’ने स्वीकारून यासाठी ३०० कोटींचा प्रकल्प हाती घेतला.

दरम्यान, हा प्रकल्प जाहीर झाल्यापासून त्याला स्थानिकांनी विरोध केला. हा जनतेच्या पैशांचा गैरवापर असल्याचा आरोप करीत काँग्रेसचे माजी नगरसेवक असिफ झकेरिया यांनी हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली होती, तर स्थानिकांनी स्वाक्षरी मोहीम राबवून आंदोलन केले. या प्रकल्पाऐवजी खांबांखाली झाडे लावा अशीही मागणी स्थानिक रहिवाशांनी केली होती. अखेर ही मागणी मान्य करत हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आल्याची माहिती झकेरिया यांनी ‘एक्स’ समाजमाध्यमाद्वारे दिली.

‘एमएमआरडीए’चे महानगर आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी आणि आशीष शेलार यांची मंगळवारी एक बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे झकेरिया यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. याविषयी मुखर्जी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, या प्रकल्पाच्या आतापर्यंतच्या कामावर काही कोट्यवधींचा खर्च झाला असून हे कोट्यवधी रुपये मात्र पाण्यात गेले आहेत.

‘एमएमआरडीए’च्या महानगर आयुक्तांशी झालेल्या बैठकीत बॉलीवूड थीम पार्क प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. लवकरच याबाबतचा अंतिम निर्णय होईल. – ॲड. आशीष शेलार, सांस्कृतिक कार्य मंत्री