भाजप नेत्याने शिफारस केलेल्या मंडळाचीही परवानगी रद्द

मुंबई : भाजपच्या स्थानिक नेत्याने शिफारस केलेल्या मंडळाला घाटकोपर येथील मैदानावर छट पूजेचे आयोजन करता यावे म्हणून राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाला आयोजनास दिलेली परवानगी रद्द करण्याचा महानगरपालिकेचा निर्णय उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केला. त्याचवेळी भाजपच्या माजी नगरसेवकाने पत्राच्या आधारे शिफारस केलेल्या मंडळाला छटपूजेसाठी परवानगी देणारा महानगरपालिकेचा निर्णयही न्यायालयाने यावेळी रद्द केला.

हेही वाचा >>> मुंबई : पावसाळ्यानंतरही लोकमान्य टिळक टर्मिनसवरील रस्ता खड्ड्यात

एका गटाला परवानगी देणे आणि दुसऱ्या गटाला आधीच दिलेली परवानगी रद्द करणे यात महानगरपालिकेचा दुजाभाव दिसून येत असल्याचे ताशेरे न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने ओढले व महानगरपालिकेच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका राखी जाधव यांच्या मंडळाकडे गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या वेळीही ना हरकत प्रमाणपत्र नव्हते. त्यावेळी मंडळाला दिलेली परवानगी रद्द केली नव्हती. ती आताच का रद्द केली ? असा प्रश्नही न्यायालयाने महानगरपालिकेला विचारला.

राखी जाधव यांच्या श्री दुर्गा परमेश्वरी सेवा मंडळाने गेल्या आठवड्यात महानगरपालिकेच्या निर्णयाविरोधात याचिका केली होती. मात्र या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देताना सुट्टीकालीन न्यायालयाकडे दाद मागण्याची सूचना न्यायालयाने याचिकाकर्त्याला केली होती. त्यानुसार नव्याने याचिका करण्यात आली होती.

हेही वाचा >>> मुंबई पालिका रुग्णालयात येणाऱ्या तिशीपुढील प्रत्येकाची होणार उच्चरक्तदाब तपासणी

न्यायमूर्ती जमादार आणि न्यायमूर्ती गोडसे यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर ही याचिका गुरूवारी सुनावणीसाठी आली. त्यावेळी न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे म्हणणे योग्य ठरवले. तसेच राखी जाधव यांच्या मंडळाला दिलेली परवानगी योग्य ठरवताना भाजपच्या माजी नगरसेवकाने शिफारस केलेल्या मंडळाला आयोजनासाठी परवानगी देणारा महानगरपालिकेचा आदेश रद्द केला. त्याचवेळी राखी जाधव यांच्या मंडळाला ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत निर्णय घेण्याचे आदेशही स्थानिक पोलिसांना दिले. राखी जाधव यांच्या श्री दुर्गा परमेश्वरी सेवा मंडळाला घाटकोपर येथील आचार्य अत्रे मैदानावर छठ पूजा आयोजित करण्याची परवानगी महानगरपालिकेने दिली होती. मात्र नंतर ती काहीच कारण न देता रद्द करण्यात आली. दुसरीकडे भाजपचे माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी पत्र लिहून अटल सामाजिक संस्कृती सेवा प्रतिष्ठानला परवानगी देण्याची विनंती केली होती. या पत्राच्या आधारे महानगरपालिकेने सेवा प्रतिष्ठानला आचार्य अत्रे मैदानावर छट पूजेसाठी परवानगी दिली. त्यामुळे राखी जाधव यांच्या मंडळाने उच्च न्यायालयात धाव घेतली.