लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : मंत्रिमंडळ बैठकीआधीच कार्यक्रम पत्रिका (अजेंडा) वृत्तपत्रांमध्ये छापून येत असल्याने किंवा खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन त्याबाबतची माहिती प्रसारित होत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला. कार्यक्रमपत्रिकेची माहिती बैठकीआधी बाहेर फोडू नये, अशी तंबी फडणवीस यांनी मंत्री व त्यांच्या कार्यालयांना दिली, तरीही हे प्रकार घडल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा होणार आहे, याची माहिती अनेकदा त्यादिवशीच्या वृत्तपत्रात बैठकीआधीच छापून येते किंवा खासगी दूरचित्रवाणीवाहिन्यांवरून त्याचा तपशील सांगितला जातो. त्यामुळे फडणवीस चिडले असून हे प्रकार तातडीने थांबले पाहिजेत, अशी तंबी त्यांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांना दिली आहे. ही पद्धत चुकीची असून कार्यक्रमपत्रिका गुप्त असते. मंत्र्यांनी गोपनीयतेची शपथ घेतलेली असते. त्यात लपविण्यासारखे काहीही नसून काही नियम आहेत. त्यामुळे वृत्तपत्रांनी खपासाठी किंवा खासगी दूरचित्रवाणीवाहिन्यांनी टीआरपीसाठी नियम मोडू नये, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

विकिपीडियावरील आक्षेपार्ह लिखाण हटविण्याचे आदेश

छत्रपती संभाजीराजेंबद्दल विकिपीडियावर असलेले आक्षेपार्ह लिखाण तातडीने हटविण्याचे कारवाई आदेश पोलिसांच्या सायबर विभागाच्या महानिरीक्षकांना देण्यात आले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. विकिपीडिया हे देशातून चालविले जात नाही. पण ऐतिहासिक गोष्टी मोडूनतोडून लिहीणे योग्य नाही. समाजमाध्यमांमुळे भौगोलिक अधिकारक्षेत्रापुरती नियमावली करता येणे कठीण असल्याने ती केंद्र सरकारने करावी, यासाठी आमची चर्चा सुरू आहे. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण त्यालाही सीमा असून कोणाही दुसऱ्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालू शकत नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cabinet meeting program agenda chief minister devendra fadnavis warning ministers information media ssb