मुंबई : जगभर कॅन्सरचे प्रमाण आणि मृत्यूदर घटत असताना भारतात त्याची वाढ होत असल्याचे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘द लॅन्सेट’ च्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे. भारतात कॅन्सरची नवीन प्रकरणे आणि मृत्यूदर सातत्याने वाढत असून याला तज्ज्ञांनी गंभीर इशारा मानला आहे. भारतात मधुमेह तसेच उच्चरक्तदबाच्या रुग्णाना योग्य औषधोपचार मिळत नाही किंवा ती मंडळी फारशी गंभीर नसतात. त्याशिवाय तंबाखू,धुम्रपान आणि दारुचे सेवन यामुळेही कॅन्सरच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.

अभ्यासानुसार, भारतातील कॅन्सरचा प्रसार १९९० मध्ये प्रति एक लाख लोकसंख्येमागे ८४.८ इतका होता. तो २०२३ मध्ये १०७.२ वर पोहोचला आहे. याचा अर्थ १५ लाख नवीन प्रकरणे. मृत्यूदर देखील १९९० मधील ७१.७ वरून २०२३ मध्ये ८६.९ वर पोहोचला. म्हणजेच गेल्या वर्षात तब्बल १२.१ लाख रुग्णांचा मृत्यू झाला. त्याचवेळी जगभरातील चित्र वेगळे दिसत आहे.जगभर मात्र कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये घट झाली आहे. जागतिक स्तरावर १९९० मध्ये २२०.६ इतका असलेला प्रसार २०२३ मध्ये २०५.१ वर आला. मृत्यूदर तर १५०.७ वरून ११४.६ पर्यंत घसरला आहे. या उलट भारतातील वाढती आकडेवारी चिंतेत भर घालणारी ठरत आहे.

तज्ज्ञांच्या मते, भारतातील सुमारे ७० टक्के कॅन्सर हे बदलता येऊ शकणाऱ्या कारणांमुळे होतात. त्यात तंबाखू आणि दारूचे सेवन, अयोग्य आहारपद्धती, शारीरिक हालचालींचा अभाव, उच्च रक्तदाब व मधुमेह यांचा मोठा वाटा आहे. भारतातील उच्च प्रदूषणाची पातळी आणि जीवनशैलीही धोकादायक ठरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यातूनच भारतात कॅन्सर वाढताना दिसत असून ही स्थिती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.भारतात २०२४ मध्ये १५.६ लाख नवीन कॅन्सर रुग्ण आणि ८.७४ लाख मृत्यूंची नोंद झाली आहे. देशभरातील ४३ कॅन्सर नोंदणी केंद्रांवरून मिळालेल्या माहितीनुसार, २०२२ मध्ये १४.१ लाख प्रकरणे आणि ९.१६ लाख मृत्यू झाले होते.

दिल्लीस्थित एम्समधील कर्करोगतज्ज्ञांच्या मते फक्त एका दिवशी ‘नो टोबॅको डे’ किंवा ‘कॅन्सर डे’ साजरा करून उपयोग होणार नाही. सातत्याने जनजागृती मोहिमा राबवित्यात आल्या पाहिजे. तसेच कॅन्सरची व्यापक तपासणी व लवकर निदान यावर भर देणे गरजेचे आहे. महिलांमधील स्तनांच्या कर्करोगाबाबत गावपातळीवर जाऊन जागृती व तपासणी करणे आवश्यक आहे. पहिल्या टप्प्यात कर्करोगाचे निदान झाल्यास त्याला अटकाव करणे शक्य असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे एचपीव्ही आणि हिपॅटायटिस लसीकरण, हवा सुधारणा, तसेच लवकर तपासणी आणि उपचार यामुळे कॅन्सरचे प्रमाण कमी करता येऊ शकते.

जगभरातील कॅन्सरचा दर कमी होत असताना भारतात मात्र त्याचे प्रमाण झपाट्याने वाढते आहे. अशावेळी तंबाखू विरोधी मोहीम व्यापक करण्याची आवश्यकता आहे तसेच अस्वास्थ्यकर जीवनशैलीवर नियंत्रण ठेवली व लसीकरण आणि लवकर निदानावर भर दिल्यासच या वाढत्या आजारावर आळा घालता येईल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.