मुंबई : महाविद्यालयाच्या व्हॉट्स ॲप ग्रुपवर इमोजी पाठवण्यावरून झालेल्या वादातून वर्गातील विद्यार्थिनीला अश्लील शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी अल्पवयीन विद्यार्थ्याविरोधात विनयभंग व बालकांचे लैगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तक्रारदार व आरोपी अल्पवयीन विद्यार्थी असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.पीडित १६ वर्षीय मुलीच्या तक्रारीवरून निर्मल नगर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ७९ (विनयभंग) व पोक्सो कायदा कलम १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या महाविद्यालयातील मित्र-मैत्रिणींचा व्हॉट्स ॲपवर एक ग्रुप आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका विद्यार्थ्याने २ एप्रिल रोजी त्यावर व्हॉईल मेसेज पाठवला होता. त्या संदेशावर पीडित मुलीने उलटी झाल्याचा इमोजी पाठवला होता. त्याचा राग आल्यामुळे वर्गातील मुलाने पीडित मुलीला दूरध्वनी करून, व्हॉईस मेसेज व चॅटद्वारे अश्लील शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यामुळे मानसिक तणावाखाली आलेल्या मुलीने याप्रकरणी थेट निर्मल नगर पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी व्हॉईस मेसेज व संदेश पाहून याप्रकरणी गुन्हा दाखल केला

११ वीच्या विद्यार्थ्यांचा ग्रुप

आरोपी व पीडित तरूणी ११ वीत शिक्षण घेत असून त्यांच्या वर्गाचा एक ग्रुप आहे. त्यावर इमोजी पाठवल्यावरून हा वाद झाला. त्यातून आरोपीने अनेक वेळा संपर्क साधून पीडित मुलीला त्रास दिला. याप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ

मुंबईत अल्पवयीन मुले व मुली यांच्याविरोधात घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. मुंबईत २०२४ मध्ये बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत १३४१ गुन्ह्यांची नोंद झाली होती. २०२३ पोक्सो कायद्याअंतर्गत ११०८ गुन्ह्यांची नोंद झाली होती. मुंबईत २०२४ मध्ये पोक्सो कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये ६०९ बलात्कार, ६६७ विनयभंग व ३५ छेडछाड-अश्लील शेरेबाजी केल्याच्या घटनांचा समावेश आहे. २०२३ मध्ये अल्पवयीन मुलींवरील गुन्ह्यांतील ९९ टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले होते. २०२४ मध्ये या प्रमाणात घट झाली असून २०२४ मध्ये हे प्रमाण ९६ टक्के होते. याशिवाय विनयभंग व छेडछाड-अश्लील शेरेबाजी या गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण अनुक्रमे १०० टक्क्यांवरून ९७ टक्के व ९६ टक्क्यांवरून ९१ टक्क्यांपर्यंत घटले आहे. अल्पवयीन मुलांविरोधातील अत्याचाराच्या घडनांमध्ये बहुसंख्य आरोपी परिचीत व्यक्त आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case under pocso act was registered against a minor over obscene abuse in whatsapp group mumbai print news sud 02