मुंबई : बहुसंख्य नोकरदारांचे ‘वर्क फ्रॉम होम’ आणि पर्यायी वाहतुकीची व्यवस्था यांमुळे मध्य रेल्वेवर ठाणे-कळवादरम्यानच्या ब्लॉकचा शुक्रवारी पहिल्या दिवशी फारसा परिणाम जाणवला नाही. मात्र, हा ब्लॉक शनिवारीही सुरूच राहणार असून दिवसभरात ५३४ लोकलफेऱ्या रद्द केल्या जाणार असून याचा मोठा फटका प्रवाशांना बसणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मुंबई: पश्चिम रेल्वेवरील रविवारचा ब्लाॅक रद्द

मध्य रेल्वेच्या ब्लॉकच्या पहिल्या दिवशी गुरुवारी मध्यरात्रीपासूनच ठाणे रेल्वे स्थानकातील रुळ हलवण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. आता फलाट पाचचे रुंदीकरण सुरू झाले असून शनिवारी सायंकाळपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. रविवारी शेवटच्या टप्प्यातील कामांनंतर हा फलाट प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे.

दरम्यान, या कामांसाठी घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे लोकल वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. मात्र, ‘ब्लॉक’चा धसका घेत अनेक आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा दिली. तसेच प्रवाशांनीही रेल्वेस्थानकाची वाट न धरता रस्तेमार्गे इच्छित स्थळ गाठल्याने रेल्वेस्थानकांत प्रचंड गर्दी दिसली नाही. रस्त्यांवर मात्र, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. शनिवारी मध्य रेल्वेवरील ५३४ लोकल फेऱ्या रद्द करून रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे लोकल गाड्या चालविण्यात येणार आहेत. 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway cancelled 534 train due to mega block zws