दिवा-सावंतवाडी पॅसेंजर गाडीला रविवारी झालेल्या अपघातानंतर आता पॅसेंजर गाडीलाही आरक्षण लागू करण्याचा विचार गांभीर्याने सुरू आहे. पॅसेंजर गाडीच्या निम्म्या डब्यांना हे आरक्षण लागू करण्याचा मध्य रेल्वेचा विचार असल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडियर सुनीलकुमार सूद यांनी सांगितले. प्रवाशांसंबधी तपशीलवार माहिती उपलब्ध असावी या हेतूने हा निर्णय घेतला जाणार असल्याचे ते म्हणाले.
दिवा-सावंतवाडी पॅसेंजर गाडीला रविवारी झालेल्या अपघातानंतर मृतांची व जखमींची ओळख पटवणे कठीण झाले होते. कोकण रेल्वेमार्गावर नागोठणे-रोहा या स्थानकांदरम्यान झालेल्या या अपघातानंतर सर्वप्रथम मध्य आणि कोकण रेल्वे या दोन प्रशासनांमधील वादाने पेट घेतला.  दिवा-सावंतवाडी ही गाडी पॅसेंजर असल्याने या गाडीचे दोनच डबे आरक्षित असतात. उर्वरित डब्यांमधील प्रवासी आयत्या वेळी तिकीट काढून प्रवास करतात. ही गाडी अनारक्षित असल्याने बऱ्याचदा या गाडीमध्ये मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी असतात. या प्रवाशांबाबतची कोणतीही माहिती रेल्वे प्रशासनाकडे उपलब्ध नसते. ही गोष्ट लक्षात घेऊन आता मध्य रेल्वे पॅसेंजर गाडय़ांच्या एकूण डब्यांपैकी निम्मे डबे आरक्षित प्रवाशांसाठी नियुक्त करण्याचा विचार करत असल्याचे सूद यांनी सांगितले. हा निर्णय घेतल्याने बहुतांश प्रवाशांचे नाव, पत्ता आणि आपत्कालिन परिस्थितीत संपर्क क्रमांक ही माहिती रेल्वेकडे उपलब्ध असेल. परिणामी जखमींच्या नातेवाईकांशी तातडीने संपर्क साधणे शक्य होईल, असे ते म्हणाले.
प्रवासी संघटनांचा विरोध
या विचाराला प्रवासी संघटनांनी कडाडून विरोध केला आहे. कोकण रेल्वेमार्गावरून फक्त कोकणात जाणाऱ्या गाडय़ांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी आहे. त्यापैकी दिवा-सावंतवाडी आणि दादर-रत्नागिरी या पॅसेंजर गाडय़ांवर कोकणातल्या प्रवाशांची भिस्त असते. या गाडय़ांमध्येही आरक्षण लागू केल्यास उरलेल्या साधारण डब्यांमध्ये प्रचंड गर्दी होईल. त्यामुळे होणाऱ्या दुर्घटनेसाठी मध्य रेल्वे तयार असेल का, असा प्रश्न कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष संतोष पवार यांनी विचारला आहे.