मुंबई : अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याला प्रवेशाच्या अंतिम दिनांकापर्यंत प्रवेश रद्द करता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये लिंक उपलब्ध करून दिली आहे. यामुळे संस्थास्तरावर किंवा व्यवस्थापन कोट्यातून पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यास विद्यार्थ्यांना नियमित फेरीतील प्रवेश रद्द करता येणार आहे. या कोट्यातून होणारे प्रवेश गुणवत्तेनुसारच होणार असल्याचेही सीईटी कक्षाने परिपत्रकाद्वारे जारी केले आहे.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून अभियांत्रिकी पदवीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत महत्त्वाचे परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. ८ ते १५ सप्टेंबर या काळात संस्थात्मक आणि व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश होणार आहेत. यासाठी अभियांत्रिकी संस्थाना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. प्रवेश रद्द करण्याच्या प्रक्रियेबाबत परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की माहिती पुस्तिकेतील नियम क्रमांक १५ नुसार विद्यार्थ्याला कोणत्याही कारणास्तव प्रवेश रद्द करायचा असल्यास त्यासाठीची सुविधा सीईटी सेल पोर्टलवरील विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध असेल. ही लिंक प्रवेशाच्या अंतिम मुदतीपर्यंत खुली असणार आहे.
विद्यार्थ्याने या लिंकद्वारे प्रवेश रद्द केला तर सुरक्षा ठेव आणि अनामत शुल्क वगळता इतर सर्व शुल्क परत मिळेल, असे नमूद करण्यात आले आहे. पालक, विद्यार्थी आणि संस्था यांनी या प्रक्रियेची वेळेत नोंद घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे. या सूचनांमुळे अभियांत्रिकी पदवी प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता राखली जाणार असून, विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द करण्यासाठी थेट लॉगिनमधील लिंक ही मोठी सुविधा ठरणार आहे. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांना आता वेगळी प्रक्रिया न करता थेट ऑनलाइन पद्धतीने प्रवेश रद्द करता येणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठीच्या प्रवेश प्रक्रियेत संस्थात्मक कोटा व केंद्रीभूत प्रवेशानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश देण्यासाठी नियम स्पष्ट करण्यात आले आहेत. माहिती पुस्तिकेतील नियम १३ नुसार संस्थात्मक प्रवेश प्रक्रिया पूर्ण पारदर्शकतेने आणि इंटर-से-मेरिटच्या आधारेच करणे आवश्यक आहे. यासाठी संस्थांनी आपल्या संकेतस्थळावर जागांची माहिती, प्रवेशाची जाहिरात आणि वेळापत्रक प्रसिद्ध करणे बंधनकारक असणार आहे.
संस्थात्मक कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी थेट संस्थेकडे अर्ज केले आहेत, तर काहींनी सीईटी पोर्टलवर अर्ज भरले आहेत. या सर्व अर्जांची यादी संबंधित संस्थांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिली जाणार असून त्यावरून इंटर-से-मेरिटच्या आधारे प्रवेश प्रक्रिया राबवावी लागणार आहे. यामध्ये संस्थात्मक कोट्यातील जागा जमा केलेल्या संस्था किंवा ज्यांच्याकडे कोटा उपलब्ध नाही, त्यांनी केवळ केंद्रीभूत प्रवेशानंतर रिक्त राहिलेल्या जागाच भरण्याची परवानगी असेल. तसेच आरक्षित वर्गातील जागा संबंधित वर्गातीलच विद्यार्थ्यांना देणे अनिवार्य राहणार आहे.